रिओमध्ये भारतासाठी पहिला दिवस निराशेचा
By Admin | Updated: August 7, 2016 14:33 IST2016-08-07T14:33:31+5:302016-08-07T14:33:31+5:30
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रोईग आणि हॉकी हे दोन क्रीडा प्रकार सोडले तर, पहिला दिवस निराशाजनक ठरला.

रिओमध्ये भारतासाठी पहिला दिवस निराशेचा
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. ७ - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रोईग आणि हॉकी हे दोन क्रीडा प्रकार सोडले तर, पहिला दिवस निराशाजनक ठरला. दतू भोकनळने रोईंगमध्ये उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने आयर्लंडवर मात करुन विजयी सलामी दिली. अन्यथा पहिला दिवस भारतासाठी निराशाजनकच ठरला.
हमखास पदकाची अपेक्षा असलेल्या जीतू रायने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात निराशा केली. जीतूने अंतिम फेरी गाठली मात्र तिथे त्याला 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
टेनिसमध्ये पदकाचे दुसरे आशास्थान असलेले लिएंडर पेस-रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे यांना पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. आता मिश्र दुहेरीवर आशा जिवंत आहेत.
वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताची मीरबाई चानूला सहा प्रयत्नात फक्त एकदाच वजन उचलता आले. २१ वर्षीय चानू जून महिन्यात पतियाळामध्ये निवड चाचणीच्यावेळी केलेल्या कामगिरीच्या जवळपासही पोहचू शकली नाही.
टेनिस पाठोपाठ टेबल टेनिसमध्येही भारताच्या पदरी निराशा आली. भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. टेबल टेनिसच्या पहिल्या फेरीत सौम्यजीत घोषही बाहेर झाला.
महिला नेमबाज आयोनिका पॉलही अपेक्षानुरुप कामगिरी करु शकली नाही.