विजयी प्रारंभ करण्याचा भारताचा निर्धार
By Admin | Updated: October 7, 2014 03:07 IST2014-10-07T03:07:25+5:302014-10-07T03:07:25+5:30
भारतीय संघ कोचीतील नेहरू स्टेडियममध्ये कामगिरीत सातत्य राखताना वेस्ट इंडीजविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे विजयाची हॅट्रिक नोंदविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे

विजयी प्रारंभ करण्याचा भारताचा निर्धार
कोची : भारतीय संघ कोचीतील नेहरू स्टेडियममध्ये कामगिरीत सातत्य राखताना वेस्ट इंडीजविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे विजयाची हॅट्रिक नोंदविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. कोचीतील नेहरू स्टेडियम कलूर आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या नावाने ओळखल्या जाते. जवळजवळ ६० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये १ एप्रिल १९९८ मध्ये भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान पहिला वन-डे आंतरराष्ट्रीय सामना खेळल्या गेला. तेव्हापासून आजतागायत या स्टेडियममध्ये ९ सामने खेळल्या गेले असून त्यात भारताने ६ सामन्यांत विजय मिळविला तर दोन सामन्यांत यजमान संघाला पराभव स्वीकारावा लागला. एक सामना रद्द झाला. भारताचा या मैदानावरील १० वा तर विंडीजविरुद्धचा दुसरा सामना खेळल्या जाणार आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध भारताची यापूर्वीची लढत गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यावेळी टीम इंडियाने विराट कोहलीच्या ८६ धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर विजयाला गवसणी घातली होती.
वेस्ट इंडिजने ४८.५ षटकांत २११ धावांची मजल मारली होती तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३५.२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात विजय साकारला. विराटच्या ८६ धावांच्या खेळी व्यतिरिक्त रोहित शर्माने शानदार ७२ धावांची खेळी केली होती. अष्टपैलू रवींद्र जडेजा व कामचलावू फिरकीपटू सुरेश रैनाने प्रत्येकी ३ बळी घेतले होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील ही पहिली लढत होती. भारताने सलामी लढतीत विजय मिळवित मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. गेल्या वर्षी कोचीमध्ये भारताने इंग्लंडचा १५ जानेवारी रोजी १२७ धावांनी पराभव केला होता. बुधवारी विंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत यजमान भारताने विजय मिळविला तर मालिकेत आघाडी घेण्यासह यजमान संघ या मैदानावर विजयाची हॅट््ट्रिक पूर्ण करणार आहे. कोचीमध्ये माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडने पाच सामन्यांत २२३ धावा फटकाविल्या आहेत.
द्रविड या मैदानावर सर्वाधिक धावा फटकाविणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (४ सामन्यात १० बळी) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. कर्णधार धोनीने या मैदानावर १५६ तर विराटने २ सामन्यात १२३ धावा फटकाविल्या आहेत. जडेजाने २ सामन्यात ५ बळी घेतले आहेत. उभय देशांदरम्यान आजतागायत ११२ वन-डे सामने खेळल्या गेल्या असून त्यात भारताने ५० तर विंडीजने ५९ सामन्यांत विजय मिळविला आहे. एक सामना टाय संपला तर दोन सामन्यांत निकाल शक्य झाला नाही. (वृत्तसंस्था)