धोनीच्या घरच्या मैदानावर भारताचा पराभव
By Admin | Updated: October 26, 2016 22:42 IST2016-10-26T21:41:07+5:302016-10-26T22:42:31+5:30
न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे.

धोनीच्या घरच्या मैदानावर भारताचा पराभव
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 26 - न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. न्यूझीलंडनं दिलेल्या 260 धावांचं आव्हान पार करताना भारताची अक्षरशः धांदल उडाली आहे. न्यूझीलंडनं भारतावर 19 धावांनी विजय मिळवला आहे. कर्णधार धोनीला घरच्या मैदानावरच पराभव स्वीकारावा लागला आहे. किवींच्या आक्रमक खेळीपुढे भारताचा निभाव लागला नाही.
भारताकडून रहाणेनं सर्वाधिक 57 धावा केल्या. तर कोहली 45 धावांशिवाय चमकदार खेळी करू शकला नाही. कोहली आणि रहाणेच्या 79 धावांच्या भागीदारीमुळे भारताचा पाया सुरुवातीला मजबूत होता. मात्र त्यानंतर भारतानं लागोपाठ बळी टाकण्यास सुरुवात केल्यानं भारताच्या पदरी पराभव आला. शर्मा 11, धोनी 11, पटेल 38, पांडेय 12, पंड्या 9 धावा काढून तंबूत परतले. तर जाधवला साधा भोपळाही फोडता आला नाही. एकंदरीतच भारतानं आज खराब कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे.
तर तत्पूर्वी न्यूझीलंडने 50 षटकांत सात बाद 260 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडनं दमदार सुरुवात केली होती. मात्र भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 260 धावांवरच त्यांना रोखलं होतं. सलामीवीर गुप्टील आणि लॅथमने पहिल्या विकेटसाठी 96 धावांची खेळी केली. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दाद न देता फटकेबाजी सुरूच ठेवली होती. हार्दिक पांडयाच्या गोलंदाजीवर गुप्टीलने (72) धावांवर यष्टीरक्षक धोनीकडे झेल दिला. लॅथेमला (39) धावांवर अक्षर पटेलने रहाणेकरवी झेलबाद केले. कर्णधार विल्यमसन (41) धावांवर अमित मिश्राच्या गोलंदाजीवर बाद झाला. नीशॅमला (6) धावांवर अमित मिश्राने कोहलीकरवी झेलबाद केले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 2-2वर आला आहे.