यूएईवर भारताचा दिमाखदार
By Admin | Updated: February 28, 2015 16:40 IST2015-02-28T14:17:48+5:302015-02-28T16:40:42+5:30
वर्ल्डकपमध्ये भारताने दुबळ्या यूएईवर नऊ गडी राखत दणदणीत विजय मिळवला.

यूएईवर भारताचा दिमाखदार
>ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. २८ - वर्ल्डकपमध्ये भारताने यूएईवर नऊ राखत दणदणीत विजय मिळवला असून रोहित शर्माचे अर्धशतक आणि आर.अश्विनच्या चार विकेटने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
शनिवारी वर्ल्डकपमध्ये बलाढ्य भारताचा सामना संयुक्त अरब अमिरातीशी (यूएई) होता. यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आर. अश्विन, रविंद्र जडेजाची फिरकीने यूएईच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. या दोघांना वेगवान गोलंदाज उमेश यादव व भुवनेश्वर कुमारने मोलाची साथ दिली. भारतीय गोलंदाजांसमोर यूएईचा एकही फलंदाज तग धरु शकला नाही व त्यांचा संपूर्ण संघ १०२ धावांमध्येच माघारी परतला. शैमान अन्वरची ३५ धावांची खेळी वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. भारतातर्फे आर.अश्विनने १० षटकांत २५ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. रविंद्र जडेजा व उमेश यादवने प्रत्येकी २, मोहित शर्मा व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक विकेट घेतली.
यूएईचे १०३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी रोहित शर्मा व शिखर धवन ही जोडी सलामीला उतरली. वर्ल्डकपमध्ये सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणारा शिखर धवन या सामन्यात अपयशी ठरला. शिखर १४ धावांवर झेलबाद झाला. यानंतर रोहितने विराट कोहलीच्या साथीने भारताला दिमाखदार विजय मिळवून दिला. रोहितने नाबाद ५७ आणि विराटने नाबाद ३३ धावांची खेळी केली. भारताने १८. ५ षटकांमध्ये १०३ धावांचे लक्ष्य गाठले.