वेस्ट इंडिज समोर भारताचे १९३ धावांचे विराट आव्हान
By Admin | Updated: March 31, 2016 20:41 IST2016-03-31T20:37:45+5:302016-03-31T20:41:55+5:30
विराट कोहलीच्या आक्रमक ८९ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या.

वेस्ट इंडिज समोर भारताचे १९३ धावांचे विराट आव्हान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - विराट कोहलीच्या आक्रमक ८९ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. भारतातर्फे विराट कोहलीने पुन्हा एकदा जिगरबाज आक्रमक खेळी करताना ४७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या. त्याला रहाणे (४०) आणि धोनीने (१५) चांगली साथ दिली.
रैना सतत अपयशी ठरत असल्यामुळे धोनी आज ४ क्रमांकावर फलंदाजीस आला. धोनी आणि विराट कोहलीने ४.३ षटकात झटपट ६४ धावांची भागीदीरी केली. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताला दमदार सुरवात करुन दिली आहे. टी २० विश्वचषकात भारताला आतापर्यंत अशी सुरवात मिळाली नव्हती. सलामीवर शिखर धवनला आराम देऊन अजिंक्य रहाणेला संधी देण्याचा निर्णय धोनीला फायद्याचा ठरला.
रोहित आणि रहाणे यांनी ७.२ षटकात ६२ धावांची सलामी दिली. ही या विश्वचषकातील भारतातर्फे सर्वात मोठी सलामीची भागीदारी होय. रोहित शर्मा संघाच्या ६२ धावा असताना बाद झाला. त्याने ३१ चेंडूचा सामना करताना ३ षटकार आणि ३ चौकाराच्या मदतीने झटपट ४३ धावा जमवल्या.
दरम्यान आंद्रे रसेलने पहिल्या षटकात केवळ २ धावा दिल्या. दुसरे षटक घेऊन आलेल्या सॅमुअल बद्रीने ४ धावा खर्च केल्या. ब्रेथवेटने टाकलेल्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहितने षटकार मारून ९ धावा वसूल केल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात रोहितने २० धावा चोपून काढल्या. त्यानंतर रोहित शर्मा ३१ चेंडूत ४३ धावा काढून बद्रीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अजिंक्य रहाणेने संथ सुरवातीनंतर अक्रमक ४० धावा केल्या. यामध्ये २ चौकारांचा समावेश आहे. रहाणे आणि कोहलीयांनी दुसऱ्या विकेटसाठी ८.१ षटकात ६६ धावांची भागीदारी केली.
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार सॅमीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रीत केले. भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत, सतत अपयशी ठरणाऱ्या शिखर धवन ऐवजी मुंबईकर अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळाले आहे. तर दुखापतग्रस्त युवराज ऐवजी मनिष पांडेला संघात स्थान दिले आहे. यामधून जिंकणारा संघ ३ तारखेला इंग्लडशी दोन हात करणार आहे. सर्वांचे लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या खेळीकडे. या दोघांच्या कामगिरीवर दोन्ही संघांचा विजय अवलंबून असेल.
वेस्ट इंडिज संघ - डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युएल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, लेंडल सिमन्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल.
भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, मनिष पांडे, रविचंद्रन आश्विन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या.