बजरंग पुनियाची नववर्षाची दणक्यात सुरुवात; पहिल्याच स्पर्धेत जिंकलं सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 13:18 IST2020-01-19T13:18:32+5:302020-01-19T13:18:57+5:30
महिला गटात विनेश फोगाटनं 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं होतं

बजरंग पुनियाची नववर्षाची दणक्यात सुरुवात; पहिल्याच स्पर्धेत जिंकलं सुवर्ण
भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियानं शनिवारी रोम मालिका क्रमवारीत 65 किलो फ्री स्टाइल वर्गात सुवर्ण पदक जिंकलं. 2020च्या पहिल्याच स्पर्धेत बजरंगनं या पदकासह दणक्यात सुरुवात केली. त्याच्यासह रवी दहीयानंही 61 किलो वजनी गटात खेळताना सुवर्णपदक जिंकलं.
बजरंगनं अंतिम फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ओलीचा 4-3नं पराभव केला. या स्पर्धेत महिला गटात विनेश फोगाटनं 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं होतं. बजरंगला पहिल्या खेळात अमेरिकेच्या जेन एलन रदरफोर्डच्या विरोधात घाम गाळावा लागला होता. तरीही उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तो 5-4 असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. उपांत्यपूर्व फेरीत बजरंगनं अमेरिकेच्या जोसेफ क्रिस्टोफर मॅक केनाला 4-2नं पराभव केला होता. तर उपांत्य फेरीत युक्रेननं वासिल शुपतारला 6-4मध्येच गुंडाळलं.
दुसऱ्या सामन्यात रवीनं 57 किलोएवजी या स्पर्धेत 61 किलोत सहभाग घेतला. त्यानं कझाकस्तानच्या नुर्बोलत अबदुआलीयावर 6-0 वर दणदणीत विजय मिळवला. त्यानं पहिल्यांदा मोलदोवाच्या एलेक्झांड्रू चिरतोआका आणि कझाखिस्तानच्या नुरिस्लाम सानायेववर मात केली. वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेती दीपक पुनियाचं 86 किलो वजनी गटातच आव्हान संपुष्टात आलं. दीपकला सुरुवातीलाच पुएर्टो रिकोच्या इथान एड्रियन रामोकडून 1-11नं पराभव पत्कारावा लागला आहे.