Indian Women Hockey team: भारतीय महिला हॉकी संघाने FIH हॉकी प्रो लीगमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. मंगळवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा पेनाल्टी शूटआउटमध्ये २-१ असा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हा सामना खूपच रोमांचक होता आणि ४ क्वार्टरनंतर दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. यानंतर, भारताने शूटआउट जिंकला आणि बोनस गुण मिळवले. सामन्यात एके वेळी भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर होता. पण तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करून भारताने शानदार पुनरागमन केले. भारताकडून दीपिका आणि बलजीत कौर यांनी गोल केले तर नेदरलँड्सची कर्णधार पियान सँडर्स आणि फेय व्हॅन डेर एल्स्ट यांनी गोल केले.
हॉकी इंडियाने जाहीर केले बक्षीस
भारतीय महिला संघाने आजपर्यंत पेनल्टीशूट आऊटमध्ये नेदरलँड्सला कधीच पराभूत केले नव्हते. आज पहिल्यांदा भारतीय महिला संघाने हा पराक्रम केला. सहसा प्रोत्साहन म्हणून भारतीय महिला संघाच्या प्रत्येक विजयानंतर त्यांना ५०,००० रुपयांचे बक्षीस दिले जाते. पण या शानदार विजयानंतर हॉकी इंडियाने प्रत्येक विजयासाठी ५०,००० रुपयांचे बक्षीस देण्याव्यतिरिक्त भारतीय खेळाडूंना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. इतकेच नव्हे तर सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्यालाही ५०,००० रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे.
सुरुवातीला नेदरलँड्स होतं आघाडीवर
पहिल्या क्वार्टरमध्ये नेदरलँड्सने ताबा आणि गोल करण्याच्या प्रयत्नांमध्ये वर्चस्व गाजवले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये नेदरलँड्स दबाव वाढवत राहिल्याचे दिसून आले आणि १७ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून पहिला गोल झाला. यानंतर पहिल्या हाफच्या शेवटच्या दोन मिनिटांत नेदरलँड्सने आपली आघाडी दुप्पट केली. लुना फोक्केने बेसलाइनवरून उंच पासवर चेंडू घेतला आणि तो एल्स्टला सुंदरपणे खेळवला, ज्यात त्यांना दुसरा गोल मिळाला.
भारतीय महिलांचं जोरदार पुनरागमन
तिसऱ्या क्वार्टरमध्ये, भारताने आक्रमक खेळ केला आणि दोन महत्त्वाचे गोल करून सामना बरोबरीत आणला. ३५ व्या मिनिटाला, दीपिकाने डाव्या बाजूने केलेल्या शानदार ड्रिबलसह गोल केला आणि नेदरलँड्सला मागे टाकले. ४३ व्या मिनिटाला बलजीत कौरच्या शानदार गोलने भारताने बरोबरी साधली. शेवटच्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी विजयाच्या शोधात सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु कोणालाही गोल करता आला नाही. त्यानंतर भारताने शूटआउटमध्ये २-१ असा विजय मिळवला.