भारतीय पुरुष तिरंदाजी संघ अंतिम फेरीत
By Admin | Updated: May 20, 2017 03:22 IST2017-05-20T03:22:10+5:302017-05-20T03:22:10+5:30
अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीतसिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने कम्पाऊंड प्रकारात अमेरिकेचा २३२-२३० असा निसटता पराभव करीत

भारतीय पुरुष तिरंदाजी संघ अंतिम फेरीत
शांघाय : अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीतसिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने कम्पाऊंड प्रकारात अमेरिकेचा २३२-२३० असा निसटता पराभव करीत तिरंदाजी विश्वचकाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.
वर्माने यानंतर ज्योती सुरेखासोबत मिश्र पेअर प्रकारात कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये देखील प्रवेश केला.
आॅलिम्पियन अतानू दास आणि दीपिका कुमारी यांच्यासह रिकर्व्ह तिरंदाजांनी मात्र निराश केले. सर्वजण आपापल्या गटातून झटपट बाहेर पडले. कम्पाऊंड प्रकारात पुरुष संघ दुसऱ्या सेटअखेरीस ११६-११७ असा माघारला होता. पण तिसऱ्या सेटमध्ये ६०-५७ अशा विजयासह आघाडी मिळाली. अंतिम सेटमध्ये पुन्हा एकदा आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. चौथा मानांकित भारतीय संघ सुवर्णपदकाच्या लढतीत दहावा मानांकित कोलंबियाविरुद्ध खेळणार आहे.
मिश्र पेअर प्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत वर्मा-ज्योती हे अमेरिकेच्या जोडीविरुद्ध खेळणार आहेत. भारताच्या जोडीला उपांत्य सामन्यात कोरियाविरुद्ध १५२-१५८ असा पराभव पत्करावा लागला. मागच्या वर्षी रिओ आॅलिम्पिकनंतर पहिल्याच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेला अतानू दास हा क्वार्टर फायनलमध्ये नेदरलॅन्डच्या खेळाडूकडून चकित झाला. दीपिकाला रिकर्व्ह प्रकारात जपानची हायाकावा रेन हिच्याकडून १-७ ने पराभवाचा धक्का बसला. मिश्र पेअर प्रकारात अतानू- दीपिका यांच्या जोडीला रशियाच्या जोडीकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष रिकर्व्ह संघाला क्वार्टरफायनलमध्ये जपानविरुद्ध ०-३ ने पराभवाचे तोंड पहावे लागले.
सहावा मानांकित भारताचा महिला रिकर्व्ह संघ पहिल्याच फेरीत अमेरिकेकडून २-६ ने पराभूत होऊन बाहेर पडला. (वृत्तसंस्था)