वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार 'ती'ची साथ
By Admin | Updated: March 18, 2015 13:05 IST2015-03-18T11:28:59+5:302015-03-18T13:05:09+5:30
वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी करणा-या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयने वर्ल्डकप दरम्यान पत्नी किंवा प्रेयसीसोबत राहण्याची परवानगी दिली आहे.

वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार 'ती'ची साथ
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी करणा-या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयने वर्ल्डकप दरम्यान पत्नी किंवा प्रेयसीसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर विराट कोहलीला साथ देण्यासाठी अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलिया गाठते का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बीसीसीआयने वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना पत्नी किंवा प्रेयसीला सोबत नेण्यास मज्जाव केला होता. वर्ल्डकपच्या प्राथमिक फेरीत टीम इंडियाने सर्व सामने जिंकत दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला आहे. विश्वचषकात सहभागी झालेल्या बहुसंख्य देशांनी त्यांच्या क्रिकेटपटूंना पत्नी किंवा प्रेयसीला सोबत नेण्याची परवानगी दिली होती. बीसीसीआयनेही भारतीय क्रिकेटपटूंना ही मुभा द्यावी अशी मागणी जोर धरु लागली होती.
टीम इंडियाच्या कामगिरीवर बीसीसीआय खुश असून बुधवारी बीसीसीआयने भारतीय संघाला अनोखी भेट दिली. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना वर्ल्डकपदरम्यान त्यांची पत्नी किंवा प्रेयसीसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाचा फायदा विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा, कर्णधार महेंद्रसिंग धोनी व त्याची पत्नी साक्षी, शिखर धवन व त्याची पत्नी आयेशा यांना होऊ शकतो.
विराट कोहलीने मंगळवारी अनुष्का शर्मासोबतच्या प्रेमसंबंधाची जाहीर कबुली दिली होती. अनुष्का शर्माच्या एनएच १० या चित्रपटाचे कौतुक करताना विराटने अनुष्काचा उल्लेख माय लव्ह म्हणून केला होता. या ट्विटच्या पार्श्वभूमीवर विराट व अनुष्काचे एकत्र राहतील का यावर चर्चा सुरु झाली आहे.