भारताने हॉकी मालिका जिंकली
By Admin | Updated: October 11, 2015 23:52 IST2015-10-11T23:52:03+5:302015-10-11T23:52:03+5:30
भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंड दौऱ्यात चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान संघासोबत १-१ अशी बरोबरी साधून चार सामन्यांची ही मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली

भारताने हॉकी मालिका जिंकली
ख्राईस्टचर्च : भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंड दौऱ्यात चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान संघासोबत १-१ अशी बरोबरी साधून चार सामन्यांची ही मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली. न्यूझीलंड दौऱ्यात पहिला सामना हरल्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना जिंकला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी
किमान मालिका गमावण्याची भीती भारताला नव्हती.
आजच्या सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिले. यानंतर निक रॉसने ४४ व्या मिनिटाला गोल नोंदवून न्यूझीलंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. दोनच मिनिटांनंतर एस. व्ही.
सुनील याने गोल करून भारताला बरोबरीत आणले.
भारतीय संघ सुरुवातीपासूनच न्यूझीलंडवर वरचढ ठरला होता. भारतीय कर्णधाराने सुरुवातीलाच जास्त वेळ न दवडता डाव्या बाजूकडून यजमान संघाच्या बचावफळीला सुरुंग लावत तोफ डागली. परंतु न्यूझीलंडच्या एलेक्स शॉ याने तो फटका अडवला.
११ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु रूपिंदरपाल सिंगचा फटका निशाण्यावर लागला नाही. परंतु यानंतरही भारतीय संघ आक्रमक मूडमध्येच होता. पहिला गोल यजमान संघाने नोंदवल्यावर भारत पिछाडीवर जातो की काय, असे वाटत
असतानाच दोन मिनिटांत
बरोबरी साधण्यात भारताला यश
आले आणि हीच बरोबरी कायम राहिल्याने सामना अनिर्णीत अवस्थेत सुटला. भारतात होणाऱ्या एफआयएच वर्ल्ड हॉकी लीग फायनल्सच्या तयारीसाठी भारताचा हा दौरा
महत्त्वपूर्ण होता.(वृत्तसंस्था)