Neeraj Chopra Doha Diamond League: दोन वेळेचा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजला ९० मीटर लांबचे अंतर गाठता आले नव्हते आणि त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु, यानंतर दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे.
नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ९० मी.पेक्षा लांब भाला फेकत त्याचा सर्वोत्कृष्ट आकडा गाठला. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मी. भाला फेकला. दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८८.४४ मी. टप्पा गाठला. तर दुसरा थ्रो फाऊल ठरला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ९० मीटरचा टप्पा ओलांडून ही सर्वोत्तम कामगिरी केली. यापूर्वी नीरज चोप्राचा बेस्ट थ्रो ८९.९४ मी. होता.
नीरज चोप्रा ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई खेळांमध्ये दुहेरी पदक विजेता आहे. त्याने यापूर्वीही एकदा डायमंड लीग जिंकली आहे. चोप्राने २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि असे करणारा तो पहिले आशियाई भालाफेकपटू बनला होता. २०२३ मध्ये विजय मिळवल्यानंतर तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला होता.
दरम्यान, २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज ८९.४५ मीटरपर्यंत भाला फेकू शकला होता, परंतु पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकले. मात्र आता नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकला. ९० मीटरचे अंतर पार करणारा तो तिसरा आशियाई खेळाडू ठरला आहे.