भारत उपांत्य फेरीत

By admin | Published: July 16, 2017 02:10 AM2017-07-16T02:10:04+5:302017-07-16T02:10:04+5:30

शतकवीर मिताली राज (१०९ धावा, १२३ चेंडू, ११ चौकार), वेदा कृष्णमूर्ती (७० धावा, ४५ चेंडू, ७ चौकार, २ षटकार ) व हरमनप्रीत कौर (६० धावा, ७ चौकार) यांच्या

India in semi-finals | भारत उपांत्य फेरीत

भारत उपांत्य फेरीत

Next

महिला विश्वकप : न्यूझीलंडवर १८६ धावांनी मात, आता लढत आॅस्ट्रेलियाशी

डर्बी : शतकवीर मिताली राज (१०९ धावा, १२३ चेंडू, ११ चौकार), वेदा कृष्णमूर्ती (७० धावा, ४५ चेंडू, ७ चौकार, २ षटकार ) व हरमनप्रीत कौर (६० धावा, ७ चौकार) यांच्या चमकदार फलंदाजीनंतर राजेश्वरी गायकवाडच्या (५-१५) अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला संघाने शनिवारी अखेरच्या साखळी लढतीत न्यूझीलंडचा १८६ धावांनी पराभव केला आणि महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. भारताने ७ बाद २६५ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाचा डाव २५.३ षटकांत ७९ धावांत गुंडाळला. राजेश्वरीला दीप्ती शर्मा (२-२६), झुलन गोस्वामी (१-१४), शिखा पांडे (१-१२) व पूनम यादव (१-१२) यांची योग्य साथ लाभली.
न्यूझीलंडतर्फे अ‍ॅमी सॅटरवेट (२६), कॅटी मार्टिन (१२) व अ‍ॅमिला केर (नाबाद १२) यांचा अपवाद वगळता अन्य महिला फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविता आली नाही.
त्याआधी, कर्णधार मिताली राजच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ७ बाद २६५ धावांची दमदार मजल मारली. भारताच्या डावात वेदा कृष्णमूर्तीची (७० धावा, ४५ चेंडू) आक्रमक अर्धशतकी खेळीही उल्लेखनीय ठरली. फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय संघाची आठव्या षटकात २ बाद २१ अशी अवस्था झाली होती, पण मिताली (१०९) व हरमनप्रीत कौर (६०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. त्यानंतर वेदा कृष्णमूर्तीने ४५ चेंडूंना सामोरे जाताना ७० धावांची खेळी केली. वेदाने आक्रमक फटकेबाजी करताना चाहत्यांना रिझवले. वेदाच्या अर्धशतकी खेळीत ७ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे.
उपांत्यपूर्व फेरीचे स्वरुप प्राप्त झालेल्या या लढतीत मितालीची शतकी खेळी उल्लेखनीय ठरली. मितालीने १८४ व्या सामन्यात कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. तिने १२३ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या.
मिताली आॅस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या लढतीत सर्वाधिक धावा फटकावणारी व सहा हजार धावा पूर्ण करणारी पहिली महिला फलंदाज ठरली होती. मितालीने या स्पर्धेत कामगिरीत सातत्य कायम राखले आहे. मितालीने आजच्या शतकी खेळीपूर्वी या स्पर्धेत तीन अर्धशतके व एक नाबाद ४६ धावांची खेळी केलेली आहे. तिने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत.
सलामीवीर स्मृती मानधना (१३) बाद झाल्यानंतर मितालीने डाव सावरला. तिने हरमनप्रीतच्या साथीने धावफलक हलता ठेवला. हरमनप्रीतने ९० चेंडूंना सामोरे जाताना ६० धावांची खेळी केली.
३६ व्या षटकात भारताची २ बाद १५२ अशी मजबूत स्थिती होती, पण न्यूझीलंडने हरमनप्रीत व दीप्ती शर्मा (०) यांना एका पाठोपाठ एक माघारी परतवले. त्याचा मात्र भारताच्या डावावर विशेष परिणाम झाला नाही. कारण वेदाने भारतीय डावाची लय कायम राखली. भारताने अखेरच्या चार चेंडूंमध्ये ८ धावांच्या अंतरात तीन विकेट गमावल्या. न्यूझीलंडतर्फे आॅफ स्पिनर लेघ कास्परेक सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली. कास्परेकने तीन बळी घेतले तर वेगवान गोलंदाज हन्ना रोवे व ली ताहुहू यांनी अनुक्रमे दोन व एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ७ बाद २६५ धावा. (मिताली राज १०९, वेदा कृष्णमूर्ती ७०, हरमनप्रीत कौर ६०, स्मृती मानधना १३. कास्पेरेक ३/४५, रोवे २/३०, ताहूहू १/४९.)
न्यूझीलंड : २५.३ षटकांत सर्वबाद ७९ (अ‍ॅमी सॅटरवेट २६, कॅटी मार्टिन १२, अ‍ॅमिला केर नाबाद १२; राजेश्वरी गायकवाड ५-१५), दीप्ती शर्मा २-२६, झुलन गोस्वामी १-१४, शिखा पांडे १-१२, पूनम यादव १-१२).

मिताली राज @ 1000
आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत एक हजार धावांचा टप्पा गाठणारी मिताली पाचवी महिला फलंदाज ठरली. मितालीने आज २३ धावांचा आकडा मागे टाकल्यानंतर मितालीच्या नावावर हा विक्रम जोडला गेला. असा विक्रम करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
आतापर्यंत केवळ चार महिला फलंदाजांना विश्वकप स्पर्धेत एक हजार धावांचा पल्ला गाठता आला आहे. त्यात न्यूझीलंडची डेबी हेकले (१५०१), इंग्लंडची जेनेट ब्रिटिन (१२९९), चार्लोट एडवडर्््स (१२३१) आणि आॅस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क (११५१) यांचा समावेश आहे.

Web Title: India in semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.