भारत वन-डेत दुसऱ्या क्रमांकावर कायम

By Admin | Updated: October 26, 2015 23:07 IST2015-10-26T23:07:15+5:302015-10-26T23:07:15+5:30

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारताने आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे,

India retained their second position in ODI | भारत वन-डेत दुसऱ्या क्रमांकावर कायम

भारत वन-डेत दुसऱ्या क्रमांकावर कायम

दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारताने आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय टीम रँकिंगमध्ये आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे, तर स्टार फलंदाज विराट कोहलीने फलंदाजीच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती साधली असून तो दुसऱ्या स्थानी पोहोचण्यात यशस्वी ठरला.
दक्षिण आफ्रिका आपल्या तिसऱ्या स्थानी कायम आहे; परंतु मालिका ३-२ फरकाने जिंकल्याने दुसऱ्या स्थानी काबीज असलेला भारतादरम्यान त्यांचे अंतर फक्त २ रेटिंगचे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेने काल मुंबईतील अखेरचा वनडे सामना २१४ धावांनी जिंकला होता.
मालिकेआधी दक्षिण आफ्रिका संघाचे ११० गुण होते आणि भारतीय संघापासून ते ५ गुणांनी पिछाडीवर होते; परंतु एबी डीव्हिलियर्सच्या संघाने शानदार मुसंडी मारताना मालिका जिंकली. आता त्यांचे ११२ आणि भारताचे ११४ गुण आहेत. आॅस्ट्रेलिया १२७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताविरुद्ध मालिकेत चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या क्रमवारीत प्रगती झाली आहे. कर्णधार एबी डीव्हिलियर्सने पुन्हा आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे आणि दुसऱ्या स्थानावरील कोहलीपेक्षा तो ९६ गुणांनी पुढे आहे. त्याने पाच सामन्यांत तीन शतके ठोकली. तथापि, हाशिम आमला या मालिकेत आपला ठसा उमटवू शकला नाही आणि तो तीन स्थानांनी घसरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
फाफ डू प्लेसिसने सात क्रमांकांनी झेप घेतली असून तो त्याचा सहकारी यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकसोबत दहाव्या स्थानी आहे. मालिकेत दोन शतकांसह ३१८ धावा करणाऱ्या डी कॉकने १३ क्रमांकांनी झेप घेतली.
आफ्रिकेच्या फरहान बेहारडीन याने १२ क्रमांकांनी झेप घेतली असून तो ७६ व्या स्थानी पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.
आर. आश्विनची एका स्थानाने घसरण होऊन तो दहाव्या स्थानी पोहोचला आहे; परंतु अन्य भारतीय गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. त्यात अक्षर पटेलने १९ व्या स्थानांनी प्रगती केली असून २८ व्या स्थानी, अमित मिश्रा १३ स्थानांनी झेप घेत ३२ व्या स्थानी पोहोचला आहे. भुवनेश्वर कुमारची पाच
आणि उमेश यादवची दहा स्थानांनी घसरण झाली असून ते अनुक्रमे १५ व्या आणि ३५ व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. (वृत्तसंस्था)
भारताच्या रोहित शर्माने ३ स्थानांनी प्रगती साधली असून तो १२ व्या स्थानी आहे. अजिंक्य रहाणेने ११ क्रमांकांनी झेप घेतली असून तो २७ व्या क्रमांकावर आहे.
धोनीने दोन स्थानांनी प्रगती साधली असून तो सहाव्या क्रमांकावर आहे. तो आपला सहकारी शिखर धवनपेक्षा ११ गुणांनी पुढे आहे. धवन सातव्या क्रमांकावर आहे.

Web Title: India retained their second position in ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.