भारत-पाकिस्तान सामना धरमशाळाऐवजी इडन गार्डन्सवर
By Admin | Updated: March 9, 2016 17:25 IST2016-03-09T15:32:52+5:302016-03-09T17:25:44+5:30
आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये धरमशाळा येथे होणा-या सामन्याचे स्थळ आयसीसीने बदलले आहे. धरमशाळा ऐवजी कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर नियोजित तारखेला हा सामना होईल.

भारत-पाकिस्तान सामना धरमशाळाऐवजी इडन गार्डन्सवर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये धरमशाळा येथे होणा-या सामन्याचे स्थळ अखेर आयसीसीने बदलले आहे. धरमशाळा ऐवजी कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना होईल. १९ मार्चलाच ठरलेल्या वेळेनुसार हा सामना खेळवला जाईल असे आयसीसीचे पदाधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले.
सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचे नियोजित स्थळ बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला असे रिचर्डसन यांनी सांगितले. कोलकात्यातील ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो अशी शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती.
हिमाचलप्रदेश सरकारने सुरुवातीला सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था देण्यास नकार दिला होता. नंतर ते सुरक्षा देण्यास तयार होते. पण मंगळवारी पाकिस्तानातून आलेल्या व्दिसदस्यीय शिष्टमंडळाने धरमशाळा येथील स्टेडियमची पाहणी केल्यानंतर सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे धरमशाळाऐवजी कोलकात्याला सामना हलवला जाण्याची शक्यता होती. अखेर कोलकात्याला या सामन्याच्या आयोजनाची संधी मिळाली आहे.
भारत-पाकिस्तान मालिका आयोजनाची चर्चा करण्यासाठी मुंबईत आलेल्या पीसीबी अध्यक्षांची बीसीसीआय अध्यक्ष सशांक मनोहर यांच्या बरोबरची बैठक शिवसैनिकांनी उधळल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीसीसीआय-पीसीबीची बैठक आयोजित करण्याची तयारी दाखवली होती. भारतात सर्व सामन्यांच्या स्थळी कडेकोट सुरक्षा बंदोबस्ताचे आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे असे रिचर्डसन यांनी सांगितले.