भारताचा लागणार कस
By Admin | Updated: March 18, 2015 23:25 IST2015-03-18T23:25:58+5:302015-03-18T23:25:58+5:30
सलग सहा सामने जिंकणाऱ्या गतविजेत्या भारताचा खरा कस उद्या गुरुवारी बांगलादेशविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात लागणार आहे.

भारताचा लागणार कस
विश्वचषक : बांगलादेशविरुद्ध आज उपांत्यपूर्व लढत
मेलबोर्न : सलग सहा सामने जिंकणाऱ्या गतविजेत्या भारताचा खरा कस उद्या गुरुवारी बांगलादेशविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व
सामन्यात लागणार आहे. आत्मविश्वासाने खेळणाऱ्या बांगला संघावर मात करण्याच्या निर्धाराने धोनी अॅन्ड कंपनीला मैदानात उतरावे लागेल.
गेल्या महिनाभरात सातत्याने विजय मिळविणाऱ्या भारताने आॅस्ट्रेलिया, तसेच न्यूझीलंडसोबत जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून स्वत:ला सज्ज केले. या स्पर्धेचे स्वरूप असे आहे, की उपांत्यपूर्व सामन्यांपासून तीन सामने जिंकणारा संघ जगज्जेता बनू शकेल. भारताने पहिल्या सामन्यात पाकला नमविल्यापासून विजयी लय कायम ठेवली. द. आफ्रिका, यूएई, वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांना ओळीने नमविले. या सर्व सामन्यांत भारताची कामगिरी पाहिल्यास एमसीजीवर बांगलादेशच्या विजयाची कुठलीही शक्यता दिसत नाही. पण, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. बांगलादेशने इंग्लंडला घरचा रस्ता दाखविला, हे विसरून चालणार नाही.
बांगलादेशनेच २००७ साली राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव करीत स्पर्धेबाहेर ढकलले होते. सध्याचा कर्णधार धोनी हा त्या संघातही होता. खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात भारत बांगलादेशवर वरचढ आहे. अशा वेळी भारतीय संघाच्या चुकांचा त्यांना लाभ होऊ शकतो.
फलंदाजीची तुलना केल्यास भारतीय संघातील पहिले सहा फलंदाज जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांचा सामना करूशकतात. बांगलादेशचे फलंदाज मात्र सातत्य राखण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी आतापर्यंत मोठी खेळी केली नसली, तरी हे दोघे विराट किंवा रैना यांच्या तुलनेत कमी धोकादायक नाहीत. शिखर धवनने ३३७ धावा केल्या असून, खेळपट्टीवर स्थिरावला की गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतो. ३०१ धावांची नोंद करणाऱ्या कोहलीने पाकविरुद्ध शतक ठोकले होते. रैनाने झिम्बाब्वेविरुद्ध आत्मविश्वास परत मिळविला. कोहलीने विंडीज आणि झिम्बाब्वेविरुद्ध दडपणातही चांगला खेळ केला. या तुलनेत प्रतिस्पर्धी संघातील तमिम इक्बाल, इमरुल कायेस, इनामूल हक हे फलंदाज भारतीयांपेक्षा दुबळे आहेत. फॉर्ममध्ये असलेला महम्मदुल्लाह याच्या ३४४ धावा असून, त्याने इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकविली आहेत. मुशफिकीर रहीम आणि शाकिब अल हसन हे आक्रमक फलंदाज आहेत.
भारतीय गोलंदाजांची कामगिरी आतापर्यंत सर्वोत्तम अशीच राहिली. मोहम्मद शमी याने १५ गडी बाद केले असून, त्याच्याकडून अधिक सरस कामगिरीची आशा राहील. उमेश यादव यानेही सातत्यपूर्ण
कामगिरी केली. त्याचे दहा बळी आहेत. आर. अश्विन याने ६ सामन्यांत १२ गडी बाद केले.
भारताची उणीव असलेली बाजू अर्थात रवींद्र जडेजाची गोलंदाजी. त्याच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघातील अष्टपैलू शाकिब हा कामगिरीत उजवा ठरला. बांगलादेशची खरी चिंता त्यांची गोलंदाजी आहे. मशरफी आणि रुबेल हुसेन हे चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. कुठलाही गोलंदाज अद्याप दुहेरी आकड्यात गडी बाद करू शकला नाही. तस्किन अहमद याच्याकडे अनुभव नसल्याने तो महागडा ठरत आहे. (वृत्तसंस्था)
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, रवीचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, रविंद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहीत शर्मा.
बांगलादेश : मशरफे मोर्ताझा (कर्णधार), अल आमीन हुसेन, अनामुल हक, अराफत सन्नी, महमुदुल्लाह, मोमिनुल हक, मुशफिकर रहिम (यष्टीरक्षक), नासीर हुसेन, रुबेल हुसेन, सब्बीर रहमान, शकिब अल हसन, सौम्या सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इकबाल, तस्कीन अहमद, इमरुल कायसे.
हेड टू हेड
भारत व बांगलादेश यांच्यामध्ये आत्तापर्यंत २८ सामने झाले आहेत. यामध्ये २४ सामने भारताने जिंकले असून ३ सामन्यांमध्ये बांगलादेशने बाजी मारली आहे. एक सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
विश्वचषकमध्ये दोन्ही संघ दोनवेळा एकमेकांविरुद्ध लढले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एकवेळा विजय नोंदविला आहे.
सामन्यावर पावसाचे सावट
४गट ‘अ’मधील बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात असणारी खेळपट्टी उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यासाठीही सारखीच असेल. पाटा असणाऱ्या या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल. दोन्ही संघांचे डोळे हवामानाकडे असतील, कारण गुरुवारी दुपारी किंवा सायंकाळी काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
४आयसीसी विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश प्रथमच बाद फेरीत खेळणार आहे. दुसऱ्या बाजूला भारत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील विश्वचषकातील हा दहावा सामना आहे.
४बांगलादेशाचा फलंदाज महमुदुल्लाने या विश्वचषकात ५ सामन्यांत ३४४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, बांगलादेशाचे ५ फलंदाज या स्पर्धेत पहिल्या १० फलंदाजांच्या यादीत आहेत.
४विश्वचषकामध्ये बाद फेरीत भारताच्या एकाही फलंदाजाने आत्तापर्यंत शतक ठोकलेले नाही.
४कर्णधार मशर्राफे मोर्तझाच्या नेतृत्वाखाली बांगलादेशाने १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांतील ११ सामन्यांत त्यांनी विजय मिळविला, तर ५ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.
४बांगलादेशाचा हा ३००वा एकदिवसीय सामना आहे. त्यांनी २००४मध्ये शंभरावा सामना भारताविरुद्ध जिंकला होता. २००७ मध्ये पोर्ट आॅफ स्पेन येथे झालेल्या विश्वचषकातील लढतीत बांगलादेशने भारताचा ५ गडी राखून पराभव केला होता. या पराभवामुळे भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. (भारत सर्वबाद १९१, गांगुली ६६ आणि युवराज ४७; मोर्तझा ४/३८) प.वि. बांगलादेश ५ बाद १९२ (टी इक्बाल ५१, एम. रहिम नाबाद ५६ आणि एस अल हुसेन ५३).
भारत-बांगलादरम्यान गत पाच लढती
मिरपूर, १७ जून २०१४ :
भारतीय संघाने बांगलादेश संघाला ४७ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात भारताच्या २४.३ षटकांत सर्व बाद १०५ धावा झाल्या होत्या. सुरेश रैनाने सर्वाधिक २७ धावा केल्या होत्या. तस्कीन अहमदने २८ धावा ५ विकेट घेतल्या होत्या. बांगलादेश संघाचा डाव १७.४ षटकांत ५८ धावांत संपुष्टात आला होता. स्टुअर्ट बिन्नीने ४ धावांत ६, तर मोहित शर्माने २२ धावा ४ विकेट घेतल्या होत्या.
फातुल्ला, २६ फेब्रुवारी २०१४ (एशिया करंडक)
या समान्यात भारताने बांगलादेश संघाचा ६ विकेटनी पराभव केला होता. या वेळी शमीने ५० धावांत ४ विकेट घेतल्या होत्या. विराट कोहलीने १३६, तर अजिंक्य रहाणेने ७३ धावांची खेळी केली होती. (बांगलादेश : ७ बाद २७९; भारत : ४ बाद २८०).
मिरपूर, १६ मार्च २०१२ (एशिया करंडक)
या सामन्यात बांगलादेश संघाने भारताचा ५ विकेटनी पराभव केला होता. सचिन तेंडुलकरची शतकी खेळी व्यर्थ गेली होती. (भारत : ५ बाद २८९; बांगलादेश : ५ बाद २९३)
मिरपूर, १९ फेब्रुवारी २०११ (विश्वचषक)
या लढतीत भारतीय संघाने ८७ धावांनी विजय नोंदविला होता. या सामन्यात सेहवागने १७५, तर कोहलीने नाबाद १०० धावांची अफलातून खेळी केली होती. (भारत : ४ बाद ३७०; बांगलादेश ९ बाद २८३)
डंबुल्ला, १६ जून २०१० (एशिया करंडक)
हा सामान भारताने ६ विकेटनी जिंकला होता. या वेळी गौतम गंभीरने ८२ व धोनीने नाबाद ३८ धावा केल्या होत्या.
विजयाची आशा, पण मार्ग
खडतर : सुनील गावसकर
मेलबोर्न : बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतील भारतीय संघ विजय नोंदविण्याची आशा आहे. पण विजयाचा मार्ग मात्र खडतर असणार आहे. बांगलादेश संघाची फलंदाजी चांगली आहे. त्यांनी जर २५० पेक्षा जास्त धावा केल्या तर भारताला विजय सोपा नसेल भारतीय फलंदाजीची लाईनअप उत्कृष्ट आहे. यात शंका नाही. पण तरीसुद्धा झिम्बाबेने त्यांची परिक्षा घेतली होती. गत ६ लढतींमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगीरी जरी केली असली तरी उद्या त्यांना सावधानतेने खेळ करावा लागेल असे मत भारताचा माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी व्यक्त केला.