भारताने प्रत्येक सामना बाद फेरीप्रमाणे खेळावा
By Admin | Updated: February 28, 2015 01:15 IST2015-02-28T01:15:45+5:302015-02-28T01:15:45+5:30
पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध दिमाखदार विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाला यूएईविरुद्धच्या लढतीत कुठली अडचण भासणार नाही,

भारताने प्रत्येक सामना बाद फेरीप्रमाणे खेळावा
पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध दिमाखदार विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाला यूएईविरुद्धच्या लढतीत कुठली अडचण भासणार नाही, अशी आशा आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांत ७६ व १३० धावांनी विजय मिळवित या स्पर्धेत वर्चस्व गाजवले असले तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे विसरता येणार नाही. त्यामुळे भारताला सावधगिरी बाळगावी लागेल. भारताने स्वस्तात बाद केलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध ४०० पेक्षा अधिक धावा फटकाविण्याची कामगिरी केली.
टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित केला असून भारताने यापुढे प्रत्येक लढत बाद फेरीप्रमाणे खेळायला पाहिजे. भारताने संघामध्येही विशेष बदल करायला नको, कारण गोलंदाजांसह प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. शमी दुखापतग्रस्त असल्यामुळे यूएईविरुद्धच्या लढतीत खेळणार नसल्याचे वृत्त आहे. भारतासाठी ही निराशाजनक बाब आहे. शमी चांगल्या फॉर्मात आहे. जर भुवनेश्वर फिट नाही, तर मग तो संघासोबत काय करीत आहे? हे मला अद्याप कळलेले नाही. बाद फेरीच्या लढतीपूर्वी शमी व भुवनेश्वर हे दोन्ही गोलंदाज अनफिट असतील तर काय होईल? दोन प्रमुख वेगवान गोलंदाजांची अनुपस्थिती संघासाठी मोठा धक्का असेल.
पाकिस्तान संघ रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे; पण सध्या खेळाडू मैदानाबाहेरच्या घटनांमुळे अधिक चर्चेत आहेत. झिम्बाब्वेविरुद्धची लढत महत्त्वाची असून, सर्वांनी त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. चेंडूला उसळी मिळणाऱ्या ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल मिळविला, तर पाकिस्तान संघ निश्चितच प्रथम फलंदाजी स्वीकारेल, अशी आशा आहे. या लढतीत पाकिस्तान संघ नियमित पाच गोलंदाजांसह खेळेल, असे संकेत मिळत आहेत.
आयसीसीने चार क्षेत्ररक्षकांना बाहेर ठेवण्याच्या नियमाबाबत नव्याने विचार करायला हवा. दोन नव्या चेंडूंचा वापर करीत असताना किमान पाच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असायला हवेत. बॅट व बॉलमध्ये समतोल साधण्याचा हा एकमेव पर्याय आहे. मी एक गोलंदाज असल्यामुळे डिव्हिलियर्सने खेळ सुरू करण्यापूर्वीच मी निवृत्ती स्वीकारली, त्यासाठी देवाचा आभारी आहे. (टीसीएम)