भारत-इंग्लंड पहिला वन डे रद्द
By Admin | Updated: August 26, 2014 03:01 IST2014-08-26T03:01:55+5:302014-08-26T03:01:55+5:30
मुसळधार पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वन डे सामना सोमवारी एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला.

भारत-इंग्लंड पहिला वन डे रद्द
ब्रिस्टल : मुसळधार पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वन डे सामना सोमवारी एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही.
पाच सामन्यांच्या मालिकेतील झटपट लढतींचा थरार अनुभवायला आलेल्या स्टेडियममधील गर्दीची सामना रद्द झाल्याने घोर निराशा झाली. कसोटी मालिकेत १-३ ने पराभव पत्करणाऱ्या भारताला वन डे मालिकेत पहिला विजय मिळवित आत्मविश्वास उंचाविण्याची संधी होती पण पावसाने तीदेखील हिरावून घेतली.
मालिकेतील दुसरा सामना कार्डिफ येथे २७ आॅगस्ट रोजी खेळला जाईल. भारताने मालिकेपूर्वीच्या पहिल्या सराव सामन्यात लॉर्ड्सवर मिडलसेक्स कौंटी संघाचा ९५ धावांनी पराभव केला होता. भारताने त्या सामन्यात २३० धावा केल्या आणि मिडलसेक्सला १३५ धावांत बाद केले होते. पहिल्या वन डेसाठी दोन्ही संघांनी आपले अंतिम ११ खेळाडू देखील जाहीर केले नव्हते. कार्डिफच्या सामन्याआधी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने तसे संकेतही दिले.
दुसऱ्या वन डे पूर्वी भारताकडे अद्याप दोन दिवसांचा अवधी आहे. ही वेळ सरावासाठी उपयुक्त ठरू शकेल. भारताने ब्रिस्टल मैदानावर झालेले यापूर्वीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. येथे केनिया, श्रीलंका आणि इंग्लंडला भारताने धूळ चारली होती. इंग्लंडने या मैदानावर अखेरचा वन डे जुलै २०१० मध्ये बांगला देशविरुद्ध खेळला होता. त्यात पाच धावांनी इंग्लंड पराभूत झाला हे विशेष. ही आकडेवारी पाहता भारताला ब्रिस्टलमध्ये विजयाची आशा होती. पण पावसाचा कहर भारतीयांच्या उत्साहावर विरजण पाडणारा ठरला. आता कार्डिफमध्ये विजयासाठी प्रतीक्षा करावी लागेल. (वृत्तसंस्था)