चमक दाखविण्यास भारत उत्सुक
By Admin | Updated: October 11, 2015 05:00 IST2015-10-11T05:00:22+5:302015-10-11T05:00:22+5:30
टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयाचे खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या ‘धोनी अॅण्ड कंपनी’वर रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या

चमक दाखविण्यास भारत उत्सुक
कानपूर : टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयाचे खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या ‘धोनी अॅण्ड कंपनी’वर रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी करण्याचे दडपण आहे.
धोनीसाठी टीकाकारांना गप्प करण्याची वेळ आली आहे. कारण त्याचे नेतृत्व आणि कामगिरी यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. धोनीचा वारसदार आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या प्रभावी नेतृत्वामुळेही धोनीवर दडपण वाढले आहे. भारतीय संघ समतोल भासत असला तरी टी-२० सामन्यांच्या मालिकेतील विजयामुळे दक्षिण आफ्रिका संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, हे विसरता येणार नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करणे सोपे नाही. दक्षिण आफ्रिका संघाने या दौऱ्याची शानदार सुरुवात केली आहे.
भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहेत, पण एकूण विचार करता टी-२० संघात खेळलेलेच अनेक खेळाडू संघात असतील. उमेश यादवच्या पुनरागमनामुळे वेगवान गोलंदाजीची बाजू मजबूत होण्यास मदत मिळेल तर अष्टपैलू गुरकिरत सिंग मान वन-डेमध्ये पदार्पण करण्यास उत्सुक आहे. गुरकिरतने अलीकडेच भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली होती. उत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला अलीकडच्या कालावधीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तो चौथ्या स्थानावर फलंदाजी करताना चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रोहित शर्मा व शिखर धवन यांच्यावर पुन्हा एकदा डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी राहाणार आहे. तर मधल्या फळीत रायडूच्या स्थानी रहाणेला संधी मिळण्याची शक्यता आहे.
धर्मशाला येथे रोहितने शतकी खेळी केली होती. रोहित पुन्हा एकदा कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहे. शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना वर्चस्व गाजवण्यास प्रयत्नशील राहील. गोलंदाजी हा धोनीसाठी चिंतेचा विषय आहे. धर्मशाला व कटक येथे आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा अपवाद वगळता भारताच्या अन्य गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही. यादवच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीची बाजू मजबूत होणार आहे, पण वेगवान गोलंदाज भुवनेश्वर व मोहित यांच्यापुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे.
ग्रीन पार्कची खेळपट्टी संथ असते, असा अनुभव आहे. तेथे चेंडूला अधिक उसळी मिळत नाही. त्यामुळे येथे तीन स्पेशालिस्ट फिरकीपटूंना संधी द्यायची की तीन वेगवान गोलंदाजांना खेळवायचे, याचा निर्णय धोनीला घ्यावा लागणार आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता मोर्ने मोर्कल व डेल स्टेन यांच्या समावेशामुळे दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. या दोन्ही गोलंदाजांना टी-२० सामन्यांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. वन-डे संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सकडे केली एबोट आणि कागिसो रबादा यांच्यासारखे वेगवान गोलंदाजही आहेत. या गोलंदाजांनी टी-२० सामन्यांमध्ये छाप सोडली.
संघात कामचलावू गोलंदाजांव्यतिरिक्त इम्रान ताहिर व अॅरोन फांगिसो हे दोन स्पेशालिस्ट फिरकीपटूही आहेत. फलंदाजीचे नेतृत्व डिव्हिलियर्स करणार असून त्याला फॉर्मात असलेल्या जीन पॉल ड्युमिनीची चमकदार कामगिरीची आशा आहे.
भारतीय गोलंदाज वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरले तर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)
कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान : डीव्हिलियर्स
टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजय मिळविल्यानंतर वन-डे सामन्यांच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिका वन-डे संघाचा कर्णधार एबी डीव्हिलियर्सने व्यक्त केली. रविवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे लढतीच्या पूर्वसंध्येला डीव्हिलियर्स पत्रकार परिषदेत बोलत होता. डीव्हिलियर्स म्हणाला, ‘‘भारतीय संघ चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. टी-२० सामन्यांच्या मालिकेतील विजय महत्त्वाचा होता. या खडतर दौऱ्याची सुरुवात चांगली झाली. टी-२० मालिकेत आमच्याकडून अनेकांना अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती.
रहाणेला संधी मिळणे कठीण : धोनी
अजिंक्य रहाणेला संधी न दिल्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरत असला, तरी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामी लढतीत या प्रतिभावान फलंदाजाला सध्याच्या स्थितीत स्थान मिळणार नसल्याचे संकेत दिले आहे. रहाणे अव्वल तीन स्थानांवरील फलंदाजीमध्ये ‘फिट’ बसतो, असेही धोनीने म्हटले आहे.
मर्यादित षटकांच्या सामन्यात रहाणे स्ट्राईक रोटेट करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका धोनीने केली होती. रहाणेने पाचव्या किंवा सहाव्या स्थानापेक्षा आघाडीच्या फळीमध्ये फलंदाजी करावी, असे धोनीने म्हटले होते.
ग्रीन पार्कमध्ये सलामी लढतीत आघाडीच्या फळीत रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यांचे खेळणे जवळजवळ निश्चित असल्यामुळे रहाणेला संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे.
सहाव्या स्थानावर अंबाती रायडू आणि सुरेश रैना यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, याबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘टी-२० सामन्यांच्या मालिकेतील कामगिरीचा विचार करता या स्थानावर कुणाचीच निवड करता येणार नाही.
प्रतिस्पर्धी संघ
भारत - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रविचंद्रन आश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, गुरकिरतसिंग मान आणि अमित मिश्रा.
दक्षिण आफ्रिका - एबी डीव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डीकॉक, फाफ डू प्लेसिस, जीन पॉल ड्युमिनी, डेव्हिड मिलर, फरहान बेहरदीन, ख्रिस मॉरिस, खाया जोंदो, अॅरोन फांगिसो, इम्रान ताहिर, मोर्ने मॉर्केल, केली एबोट आणि कागिसो रबादा.