भारताचा न्यूझीलंडकडून पराभव
By Admin | Updated: April 14, 2016 02:54 IST2016-04-14T02:54:25+5:302016-04-14T02:54:25+5:30
भारतीय संघाला बुधवारी २५व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत न्यूझीलंडकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागल्याने पुढील प्रवास कठीण झाला आहे. या स्पर्धेच्या

भारताचा न्यूझीलंडकडून पराभव
इपोह : भारतीय संघाला बुधवारी २५व्या अझलान शाह हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत न्यूझीलंडकडून १-२ ने पराभवाचा सामना करावा लागल्याने पुढील प्रवास कठीण झाला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक द्यायची झाल्यास यजमान मलेशियावर विजय नोंदविण्याचे आव्हान भारतापुढे उभे राहिले आहे.
गत चॅम्पियन न्यूझीलंडने केन रसेल (२८व्या मिनिटाला) आणि निक विल्सन (४१व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे भारताला पराभूत केले. भारताकडून एकमेव गोल मनदीपसिंग याने ३६व्या मिनिटाला केला. विल्सनचा गोल भारतीय बचाव फळीच्या चुकीमुळे झाला. भारतीय गोलकीपर अपयशी ठरल्यानंतर बचाव फळीतील हरमनप्रीत याला चकवून विल्सनने चेंडू गोलजाळीत ढकलला. भारत जिंकला असता, तर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असता. शिवाय, सामना ड्रॉ झाला असता, तरी न्यूझीलंडच्या पुढे राहिला असता; पण विजयामुळे न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आला. यानंतर भारतीय संघ मलेशियाकडून पराभूत झाल्यास स्पर्धेचा अंतिम सामना आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड असा होईल. आॅस्ट्रेलियाने सलग ४ विजयांतून १२ गुण मिळविले असून, न्यूझीलंडचे ६ सामन्यांत ११ आणि भारताचे ५ सामन्यांत ९ गुण आहेत.
आकाश चिकटेच्या छातीवर चेंडू आदळल्याने संघ व्यवस्थापनाने सामना सुरू होण्याआधी गोलकीपर बदलण्याचा निर्णय घेतला. हरज्योतने गोलकीपरची भूमिका बजावली.
भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर २०व्या मिनिटाला मिळाला. न्यूझीलंडचा गोलकीपर डेव्होन मॅन्चेस्टर याने रूपिंदरपाल सिंगचा ‘ड्रॅगफ्लिकर’ परतवून लावला. केन रसेल याने २८व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. भारताने प्रत्युत्तरात वारंवार हल्ले चढविले. त्यात यश येऊन तलविंदरच्या पासवर मनदीपने गोल नोंदविला. चार मिनिटांनंतर एस. व्ही. सुनील याने प्रतिस्पर्धी बचाव फळी भेदली; पण चेंडूवरील नियंत्रण सुटल्याने गोल होऊ शकला नाही. पुढच्या मिनिटाला विल्सनने भारतीय कमकुवत बचाव फळीचा लाभ
घेऊन गोल नोंदविला. भारताला उत्तरार्धात मिळालेले पेनल्टी कॉर्नर वाया गेले. (वृत्तसंस्था)
संघात ऊर्जा नव्हती : रोलॅन्ट ओल्टमन्स
इपोह : आतापर्यंतच्या सामन्यात भारतीय संघ ज्या ताकदीने खेळला ती ताकद आणि ऊर्जा न्यूझीलंडविरुद्ध दिसलीच नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी पराभवानंतर व्यक्त केली. उकाडा आणि दमटपणा याचा कामगिरीवर विपरीत परिणाम झाला. आम्ही कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलो. येथे तापमान अधिक आहे; शिवाय मैदानावर पाण्याचे फवारे मारल्यानंतर उकाडा असह्य होतो. उकाड्यामुळे पेनल्टीवरदेखील परिणाम झाला. मैदानावर घसरण असल्यामुळे आमचे खेळाडू ‘परफेक्ट’ कामगिरीत मागे पडले, असे ओल्टमन्स यांचे मत होते.
दुष्काळग्रस्तांसाठी
हॉकी इंडियाचे दहा लाख
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळावर तीव्र चिंता व्यक्त करीत हॉकी इंडियाने दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीत दहा लाख रुपये दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना ही रक्कम लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.