भारताचा स्पेनवर २-० ने विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 03:46 IST2015-08-13T03:46:22+5:302015-08-13T03:46:22+5:30

भारताच्या पुरुष हॉकी संघाने आपल्या युरोपियन दौऱ्यातील चौथ्या सामन्यात आज येथे यजमान स्पेनचा २-० असा पराभव करीत पुन्हा एकदा विजयाची लय प्राप्त केली आहे.

India beat Spain 2-0 | भारताचा स्पेनवर २-० ने विजय

भारताचा स्पेनवर २-० ने विजय

सँट कुगाट डेल वॉलेस (स्पेन) : भारताच्या पुरुष हॉकी संघाने आपल्या युरोपियन दौऱ्यातील चौथ्या सामन्यात आज येथे यजमान स्पेनचा २-० असा पराभव करीत पुन्हा एकदा विजयाची लय प्राप्त केली आहे.
फ्रान्सविरुद्ध पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारत युरोपियन दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी स्पेनकडून १-४ गोलने पराभूत झाला होता; परंतु सरदारसिंह याच्या नेतृत्वाखालील संघाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवताना शानदार पुनरागमन करीत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. रमणदीपसिंहने १७ व्या आणि आकाशदीपसिंहने ३३ व्या मिनिटाला मैदानी गोल करताना भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेताना भारतीय संघाने आज आक्रमक सुरुवात केली. एस. व्ही. सुनील आणि आकाशदीपने काही चांगल्या चाली रचल्या;
परंतु स्पेनच्या गोलरक्षकाने चांगले बचाव केले.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये स्पेनला सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु श्रीजेश अभेद्य भिंतीप्रमाणे उभा राहिला आणि त्याने प्रतिस्पर्ध्याला गोल करू दिला नाही. त्यानंतर सुनीलनेदेखील भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला; परंतु संघ त्याचा लाभ घेऊ शकला नाही.
भारताला रमणदीपसिंहने १७ व्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला; परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले. भारताने मध्यंतरास १-० अशी आघाडी घेतली होती. (वृत्तसंस्था)

स्पेननेदेखील जोरदार हल्ले केले; परंतु गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात कोणतीही उणीव बाकी ठेवली नाही. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघ गोलचे खाते उघडू शकले नाहीत.

उत्तरार्धात भारताने खेळ उंचावला आणि त्यांचे चेंडूवरील नियंत्रणही सुरेख होते. भारताला सकारात्मक खेळाचा फायदा तिसऱ्या क्वॉर्टरच्या तिसऱ्याच मिनिटाला मिळाला. तेव्हा आकाशदीपने रमणदीपच्या सुरेख पासवर गोल करताना भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली.
भारताने त्यानंतर स्पॅनिश बचावफळीला दबावात ठेवले. स्पेनजवळ अखेरच्या क्वॉर्टरमध्ये पुनरागमन करण्याची संधी होती. त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु पुन्हा श्रीजेशरूपी भिंत भेदू शकले नाहीत.

Web Title: India beat Spain 2-0