भारताची आयर्लंडवर ८ विकेट्सने मात
By Admin | Updated: March 10, 2015 13:17 IST2015-03-10T08:52:08+5:302015-03-10T13:17:16+5:30
शिखर धवनचे शानदार शतकाच्या जोरावर भारताने आयर्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला.

भारताची आयर्लंडवर ८ विकेट्सने मात
ऑनलाइन लोकमत
हॅमिल्टन, दि. १० - शिखर धवनचे शानदार शतक (१००) आणि रोहित शर्माच्या ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने आयर्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. विशवचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग पाचवा विजय आहे. शर्मा व धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली (४४) व अजिंक्य रहाणेने (३३) विजयावर शिक्कामोर्तब केले. शिखर धवनने ११ चौकार व ५ षटकार ठोकत विश्वचषक स्पर्धेतील दुसरे शतक ८४ चेंडूत पूर्ण केले. त्याला रोहित शर्माचीही चांगली साथ मिळाली होती, मात्र ६४ धावांवर असताना शर्मा बाद झाला. शतक पूर्ण झाल्यावर धवनही तंबूत परतला. त्यानंतर कोहली व रहाणेने चांगली खेळी करत अवघ्या ३६.५ षटकांतच भारताला विजय मिळवून दिला. आयर्लंडतर्फे थॉम्प्सनने २ बळी टिपले.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे लक्ष्य ठेवले. विल्यम पोर्टरफिल्डने ६७ धावांची खेळी करत आयर्लंडला चांगली सुरूवात करून दिली खरी मात्र त्यानंतर त्यांचा डाव गडगडला आणि फलंदाज पटापट तंबूत परतले. मात्र नील ओब्रायनने ७५ धावांची महत्वपूर्ण खेळी करून आयर्लंडला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. तळाचे गडी लवकर बाद झाल्याने आयर्लंडचा डाव २५९ धावांवर आटोपला. भारतातर्फे शमीने ३, अश्विनने २ तर यादव, शर्मा, जडेजा व रैनाने १ बळी टिपला.