सराव सामन्यात भारताची आॅस्ट्रेलियावर मात
By Admin | Updated: December 5, 2014 00:36 IST2014-12-05T00:36:32+5:302014-12-05T00:36:32+5:30
भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स चषकाच्या तयारीसाठी खेळविण्यात आलेल्या सराव सामन्यात गुरुवारी आॅस्ट्रेलियाला २-० ने पराभूत केले.

सराव सामन्यात भारताची आॅस्ट्रेलियावर मात
भुवनेश्वर : भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स चषकाच्या तयारीसाठी खेळविण्यात आलेल्या सराव सामन्यात गुरुवारी आॅस्ट्रेलियाला २-० ने पराभूत केले.
६ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत यजमान भारताला ब गटात स्थान मिळाले आहे. पहिल्याच सामन्यात भारताने विजयाची नोंद करीत अलिकडे आॅस्ट्रेलिया दौऱ्यात केलेली देदीप्यमान कामगिरी सुरू ठेवली. सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये उभय संघ गोल नोंदवू शकले नाहीत. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताकडून गुरुजिंदरसिंग आणि एस.व्ही. सुनील यांनी गोल नोंदविले.
सामन्यानंतर भारतीय संघाचे हाय परफॉर्मन्स संचालक आणि कोच रोलॅन्ट ओल्टमन्स म्हणाले,‘ आमचे लक्ष्य सामन्यावर फोकस करणे आणि कमकुवतपणा दूर करणे हे असेल. सामन्यागणिक सुधारणा करण्यावर आमचा भर राहील. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही सरस कामगिरी केली.’
भारतीय संघाचा उपकर्णधार श्रीजेश म्हणाला,‘ आॅस्ट्रेलियाविरुद्ध आमचा हा अखेरचा सराव सामना होता. या संघावर विजय मिळविल्याने आत्मविश्वास दुणावला.’ आॅस्ट्रेलियन कोच ग्रॅहम रीड म्हणाले,‘या विजयाबद्दल भारतीय संघाचे कौतुक वाटते पण आम्ही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करु. आम्ही प्रत्येक सामन्यात विजयासाठी खेळतो. भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने वर्चस्व गाजविले. पण अर्जेंटिनाविरुद्ध आणखी एक सामना खेळायचा असल्याने त्या सामन्यात आम्ही विजय मिळवू.’ (वृत्तसंस्था)