भारत पराभव टाळणार?
By Admin | Updated: February 10, 2015 02:03 IST2015-02-10T02:03:58+5:302015-02-10T02:03:58+5:30
एकापाठोपाठ एक पराभव आणि काही प्रमुख खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्रस्त असलेला भारतीय संघ विश्वकप स्पर्धेपूर्वी

भारत पराभव टाळणार?
अॅडिलेड : एकापाठोपाठ एक पराभव आणि काही प्रमुख खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्रस्त असलेला भारतीय संघ विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्ध आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यास उत्सुक आहे. विश्वकप स्पर्धेपूर्वी अंतिम ११ खेळाडूंचा संघ निश्चित करण्याची भारताला ही अखेरची संधी आहे.
भारतीय संघाला आॅस्ट्रेलिया दौऱ्यात अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. कसोटी मालिका आणि तिरंगी मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला रविवारी अॅडिलेड ओव्हलमध्ये पहिल्या सराव सामन्यात यजमान आॅस्ट्रेलियाविरुद्ध १०६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. आॅस्ट्रेलियाने ३७१ धावांची दमदार मजल मारली. त्यानंतर भारतीय फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. भारतीय संघ ४५.१ षटकांत २६५ धावांत गारद झाला.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर तिरंगी मालिकेदरम्यान निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागले. कर्णधार धोनीचा फॉर्मही संघासाठी चिंतेचा विषय आहे. पहिल्या सराव सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. या व्यतिरिक्त ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रोहित शर्मा यांच्या दुखापती व आघाडीच्या फलंदाजांचे अपयश यांमुळे भारतीय संघ त्रस्त आहे. ईशांत फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याच्या स्थानी आता मोहित शर्माला संधी मिळाली आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातील पराभवानंतरही धोनीने सामन्यातील काही सकारात्मक बाबींवर चर्चा केली; पण संघाची मैदानावरील कामगिरी २०११च्या चॅम्पियन्ससाठी चिंतेचा विषय ठरली आहे. पाकिस्तानविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या लढतीसाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड अद्याप निश्चित झालेली नाही.
दुसऱ्या बाजूचा विचार करता विश्वकप स्पर्धेत सहभागी होत असलेला अफगाणिस्तान संघ या स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. अनुभवी मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील या संघात वेगवान गोलंदाज शापूर जादरान, युवा वेगवान गोलंदाज आफताब आलम व माजी कर्णधार व मधल्या फळीतील फलंदाज नवरोज मंगल यांचा समावेश आहे. या संघाने २०११मध्ये पूर्णकालीन वन-डे संघाचा दर्जा मिळविला आहे. नबीने दावा केला आहे, की अफगाणिस्तान संघ विश्वकप स्पर्धेत आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरेल. (वृत्तसंस्था)