IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:30 IST2025-09-18T11:29:22+5:302025-09-18T11:30:01+5:30
Neeraj Chopra IND vs PAK jawelin throw World Championship 2025: ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पहिल्यांदा नीरज आणि अर्शद आमनेसामने

IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
Neeraj Chopra IND vs PAK jawelin throw World Championship 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या सामन्यामुळे रणकंदन माजले आहे. २२ एप्रिलला रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे आणि क्रीडाक्षेत्रातही याचे पडसाद उमटले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला. त्याआधी भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असा सूर दिसून आला होता. आता या सर्वांमध्ये, भारत आणि पाकिस्तान मधील आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीम यांच्यात होणार आहे.
ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच आमनेसामने
गुरुवारी टोकियो येथील जपान नॅशनल स्टेडियमवर एक रोमांचक भालाफेक स्पर्धा होणार आहे. तिथे नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील. हा सामना आज, १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. दोन्ही खेळाडूंनी पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत ८४.५० मीटरपेक्षा जास्त फेक करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकनंतर दोघे मोठ्या स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
नीरज की अर्शद... पात्रता फेरीत कोण ठरलं सरस?
पात्रता फेरीत नीरज चोप्राने आपली क्षमता उत्कृष्टपणे दाखवली. गट अ मध्ये, त्याने त्याच्या पहिल्याच फेकीत ८४.८५ मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली आणि अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. गट ब मध्ये, अर्शद नदीमला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याचे पहिले दोन प्रयत्न निराशाजनक होते. त्यात तो ८० मीटरचा टप्पाही मोडू शकला नव्हता. पण तथापि, नदीमने त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या फेकीमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि ८५.२८ मीटरची शानदार फेक केली.
अंतिम सामना कधी आणि कुठे?
नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांनी आतापर्यंत १० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. अर्शद नदीमने फक्त एकदाच नीरज चोप्राला हरवले आहे, पण तो सामना ऑलिम्पिकची फायनल होती. भालाफेक स्पर्धा टोकियोमधील जपान नॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. आज भारतीय वेळेनुसार, दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी हा सामना सुरू होईल.