बीसीसीआयकडून उशीर झाल्यास नकार समजणार
By Admin | Updated: October 22, 2015 01:01 IST2015-10-22T01:01:41+5:302015-10-22T01:01:41+5:30
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबतची चर्चा रद्द झाल्यानंतर जर भारतीय

बीसीसीआयकडून उशीर झाल्यास नकार समजणार
कराची : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबतची चर्चा रद्द झाल्यानंतर जर भारतीय मंडळाकडून डिसेंबर महिन्यात प्रस्तावित मालिकेवर निर्णय घेण्यास उशीर होत असेल, तर त्याला आपण नकार समजणार, असे त्यांनी सांगितले.
शहरयार यांनी बुधवारी ट्वीट केले, ‘भारताकडून निर्णय घेण्यास उशीर होत असेल, तर आम्ही प्रस्तावित मालिकेविषयी त्यांच्याकडून नकार समजणार. आमच्याकडे जास्त वेळ उरलेला नसल्यामुळे निर्णयाविषयीचे उत्तर होकारात्मक अथवा नकारात्मक असो, परंतु उत्तर आवश्यक आहे. तसेच भारत - पाक दरम्यान द्विपक्षीय क्रिकेटचे संबंध डिसेंबरमध्ये आमच्या क्रिकेट मालिकेच्या क्षमतेवर अवलंबून आहे,’ असेही खान यांनी सांगितले.
अन्यथा माघार घेऊ...
भारतात झालेल्या विरोधामुळे निराश झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष यांनी भारतात पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतातील सुरक्षा पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही खान यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार खान यांनी बीसीसीआयला स्पष्ट सांगितले आहे की, डिसेंबरमधील प्रस्तावित भारत - पाक मालिकेसंबधी लवकर निर्णय द्यावेत, अन्यथा पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाक संघाच्या निर्णयाबाबत पीसीबी आपली भूमिका स्पष्ट करेल.
पाकिस्तानचा अंधांच्या क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार
भारत-पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेची आशा जवळपास मावळल्याने चिडलेल्या पाकिस्तानने आता भारतात पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या अंधांच्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी ब्लाईंड क्रिकेट कौन्सिलने (पीबीसीसी) स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगितले आहे. भारताबरोबर असलेल्या तणावपूर्ण संबंधामुळे, पाकिस्तानी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.