केवळ पैशासाठी बुद्धिबळ खेळत नाही: डी. गुकेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 10:45 IST2024-12-16T10:45:09+5:302024-12-16T10:45:39+5:30

बालपणापासून लुटतोय खेळाचा आनंद

i do not play chess just for money said d gukesh | केवळ पैशासाठी बुद्धिबळ खेळत नाही: डी. गुकेश

केवळ पैशासाठी बुद्धिबळ खेळत नाही: डी. गुकेश

सिंगापूर : नवीन विश्वविजेता ग्रँडमास्टर डी. गुकेशसाठी कोट्यधीश होणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु तो कधीही भौतिक लाभासाठी खेळत नाही, तर खेळाचा आनंद घेण्यासाठी खेळतो. बुद्धिबळाचा पट त्याच्यासाठी खेळणे होते तेव्हापासून त्याने ही आवड कायम राखली आहे. माझे बुद्धिबळ खेळण्याचे कारण पैसा नाही, असे जगज्जेता डी. गुकेश याने म्हटले आहे.

चेन्नईचा १८ वर्षीय गुकेश आता ११.४५ कोटी रुपयांनी श्रीमंत झाला आहे. जगज्जेतेपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून त्याने पारितोषिक म्हणून ही रक्कम मिळविली आहे. गुकेशचे वडील रजनीकांत यांनी आपल्या मुलासोबत सर्किटवर जाण्यासाठी 'ईएनटी सर्जन' म्हणून करिअर सोडले, तर त्यांची आई पद्माकुमारी एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असून कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहे. 

कोट्यधीश होणे तुझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे? असा प्रश्न विचारल्यावर गुकेशने सांगितले की, हे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा मी बुद्धिबळात आलो तेव्हा एक कुटुंब म्हणून आम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागले. माझे पालक आर्थिक, भावनिक अडचणीतून गेले. आता, आम्ही अधिक सहज असून माझ्या पालकांना त्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही. व्यक्तिशः मी पैशांसाठी बुद्धिबळ खेळत नाही. 

गुकेश नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो की, त्याने बुद्धिबळाचा पहिला पट आल्यावर हा खेळ खेळायला सुरुवात का केली. तो म्हणाला की, मी आजही तो मुलगा आहे ज्याला बुद्धिबळ आवडते. गुकेशचे वडील त्याच्या व्यवस्थापकाची भूमिका बजावतात तर त्याची आई भावनिक आणि आध्यात्मिक शक्तीचा आधारस्तंभ आहे. गुकेश म्हणाला की, आई आजही हे सांगते की, तू एक उत्तम बुद्धिबळपटू आहेस हे ऐकून मला आनंद होईल, पण तू एक महान व्यक्ती आहात हे ऐकून मला आणखी आनंद होईल.

खूप काही शिकायचं आहे! 

अजूनही किशोरवयात गुकेशला असे वाटते की, खेळाचा विद्यार्थी म्हणून तो बुद्धिबळाबद्दल जितके अधिक शिकतो तितकेच त्याला आपल्याला किती कमी माहिती आहे याची जाणीव होते. तो म्हणाला की, सर्वात महान खेळाडूही खूप चुका करतात. तंत्रज्ञान खूप प्रगत झाले असले तरीही बुद्धिबळात अद्याप बरेच काही शिकायचे आहे.
 

Web Title: i do not play chess just for money said d gukesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.