बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार : कोच संधू

By Admin | Updated: August 28, 2016 05:20 IST2016-08-28T05:20:49+5:302016-08-28T05:20:49+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे.

I am responsible for the loss of the Boxers: coach Sandhu | बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार : कोच संधू

बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार : कोच संधू

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे.
एकेकाळी वेगवान प्रगती साधत असलेली भारतीय बॉक्सिंग संघटना गेल्या चार वर्षांत राजकारणात अडकताच निर्माण झालेला प्रशासकीय गलथानपणादेखील या पराभवास जबाबदार असल्याचे संधू म्हणाले. जे झाले त्याचे मला दु:ख आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत तिन्ही बॉक्सर्सनी बजावलेली कामगिरी समाधानकारक होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांना कठीण ड्रॉ मिळाला. परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटत होते, पण चार वर्षांत काहीही काम झाले नाही.
बीजिंगमध्ये विजेंदरने, तर लंडनमध्ये मेरिकोमने कांस्य जिंकले. यंदाही भारताला पदक मिळेल अशी आशा होती, पण पात्रता गाठणारे तिन्ही बॉक्सर अपयशी ठरले. यासंदर्भात संधू म्हणाले, ‘माझे सर्व बॉक्सर पदक विजेत्यांविरुद्ध पराभूत झाले. मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही, पण आम्हाला सत्यस्थिती समजावी लागेल. आमचा ‘ड्रॉ’देखील कठीण होता.’
शिवा थापा (५६ किलो) हा क्यूबा रोबेसी रमिरेझकडून पराभूत झाला. रमिरेझ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. ६४ किलो गटात मनोज कुमार हा सुवर्णविजेता उझबेकिस्तानचा फझलीउद्दीन गेइबनाझारोव्ह याच्याकडून पराभूत झाला. विकास कृष्णन्ला रौप्य विजेता मेलिकूझेव्ह याने नमविले
होते. आमच्या खेळाडूंना सध्याच्या तुलनेत यापूर्वी कधीही चांगल्या सोई मिळाल्या नव्हत्या. साईच्या महासंचालकांकडूनही सर्व सोई उपलब्ध होऊ शकल्या. पण, बॉक्सिंग महासंघाच्या निलंबनामुळे आमच्या खेळाडूंना कझाखस्तान, उझबेकिस्तान किंवा क्युबामध्ये सरावाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या. या देशांमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी देखील आमच्या खेळाडूंना बोलविण्यात आले नव्हते. यासाठीच भक्कम महासंघाची गरज आहे. महासंघ तयार करून भारताला विश्व बॉक्सिंग सीरिजमध्ये स्थान मिळवून घ्यावे लागेल. जे खेळाडू सीरिज आणि लीग खेळत राहतात त्यांचेच आॅलिम्पिक बॉक्सिंगवर वर्चस्व राहिले हे विशेष.

आमच्या बॉक्सरपुढील आव्हान समजून घ्या. बॉक्सिंगच्या प्रगतीसाठी अहंकार सोडून एकत्र आले पाहिजे. भक्कम राष्ट्रीय महासंघाअभावी आम्ही सर्वजण अनाथ आहोत, ही आमची कळकळ समजून घ्या. पाया मजबूत असल्याशिवाय काहीच होणार नाही. महासंघ नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचे कुणी ऐकणार नाही. तांत्रिक प्रतिनिधित्व देखील मिळणार नाही. आमच्या खेळाडूंना सरावाच्या सर्व सुविधा मिळाल्या पण प्रतिस्पर्धा करण्यासाठी विदेशी अनुभव मात्र मिळू शकला नव्हता.

Web Title: I am responsible for the loss of the Boxers: coach Sandhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.