यजमान न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: March 1, 2015 01:12 IST2015-03-01T01:12:27+5:302015-03-01T01:12:27+5:30

आॅस्ट्रेलियाला ३२.१ षटकांत १५१ धावांत लोळविणाऱ्या न्यूझीलंडने एका गड्याने संघर्षपूर्ण विजयाची नोंद करीत शनिवारी विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Hosts New Zealand in quarter-finals | यजमान न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत

यजमान न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत

गोलंदाजांचे वर्चस्व : २६ धावांत आॅस्ट्रेलियाने गमावले आठ फलंदाज
आॅकलंड : ट्रेंट बोल्टने कारकीर्दीत सर्वाधिक पाच बळी घेताच आॅस्ट्रेलियाला ३२.१ षटकांत १५१ धावांत लोळविणाऱ्या न्यूझीलंडने एका गड्याने संघर्षपूर्ण विजयाची नोंद करीत शनिवारी विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. कमी धावसंख्येच्या या सामन्यात अनेक चढउतार अनुभवायला मिळाले. सामन्यावर गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले हे विशेष.
लहान धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने केवळ २४ चेंडूंत ५० धावा ठोकल्या. मिशेल जॉन्सनचा चेंडू खांद्यावर आदळल्यानंतरही तो खेळला. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने कारकीर्दीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत २८ धावा देत सहा गडी बाद केले. त्याने मधल्या फळीला खिंडार पाडताच न्यूझीलंडची ९ बाद १४६ अशी अवस्था झाली. विजयासाठी सहा धावांची गरज होती आणि एकच गडी शिल्लक होता. त्याचवेळी केन विलियम्सनने ४२ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह नाबाद ४५ धावा ठोकल्या. त्याने कमिन्सला षटकार खेचून २३.१ षटकांत ९ बाद १५२ धावा करीत न्यूझीलंडला सलग चौथा विजय मिळवून दिला.
स्टार्कची विश्वचषकात दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. याआधी न्यूझीलंडचा टीम साऊदी याने इंग्लंडविरुद्ध ३३ धावांत सात गडी बाद केले होते. मॅक्युलमने विजयाचा पाठलाग जलदपणे केला. स्पर्धेत त्याने तिसरे अर्धशतक केवळ २१ चेंडूत पूर्ण केले. पण मार्टिन गुप्तिल (११) झटपट परतला. तो स्टार्कच्या चेंडूवर झेलबाद झाल्यानंतर रॉस टेलर १, इलियट शून्य हे झटपट बाद होताच संघाच्या ४ बाद ७९ धावा झाल्या होत्या. विलियम्सन आणि अ‍ॅण्डरसन (२६) यांनी पाचव्या गड्यासाठी ५२ धावा करीत डाव सावरला. मॅक्सवेलने अ‍ॅण्डरसनला बाद करताच न्यूझीलंडने १५ धावांत पाच गडी गमावले. पण विलियम्सनने संघाला तारले.

धावफलक :
आॅस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच त्रि. गो. साऊदी १४, डेव्हिड वॉर्नर पायचित गो. साऊदी ३४, शेन वाटसन झे. साऊदी गो. व्हेट्टोरी २३, मायकेल क्लार्क झे. विलियम्सन गो. बोल्ट १२, स्टीव्हन स्मिथ झे. रोंची गो. व्हेट्टोरी ४, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. बोल्ट १, मिशेल मार्श त्रि. गो. बोल्ट ००, ब्रॅड हॅडिन झे. लॉथम गो. अ‍ॅण्डरसन ४३, मिशेल जॉन्सन झे. विलियम्सन गो. बोल्ट ००, पॅट कमिन्स नाबाद ७, अवांतर : १२, एकूण ३२.२ षटकांत सर्वबाद १५१ धावा. गोलंदाजी : साऊदी ९-०-६५-२, बोल्ट १०-३-२७-५, मिल्ने ३-०-६-०, अ‍ॅण्डरसन ०.२-०-६-१.
न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल झे. कमिन्स गो. स्टार्क ११, ब्रेंडन मॅक्यूलम झे. स्टार्क गो. कमिन्स ५०, केन विलियम्सन नाबाद ४५, रॉस टेलर त्रि.गो. स्टार्क १, इलियोट त्रि. गो. स्कार्ट ००, कोरी अ‍ॅण्डरसन झे. कमिन्स गो. मॅक्सवेल २६, ल्यूक रोंची झे. हॅडिन गो. स्टार्क ६, डॅनियल व्हेट्टोरी झे. वॉर्नर गो. कमिन्स २, अ‍ॅडम मिल्नेत्री, गो. स्टार्क ००, टिम साऊदी त्रि. गो. स्टार्क ००, ट्रेंट बोल्ट नाबाद ००, अवांतर : ११, एकूण :२३.१ षटकांत ९ बाद १५२ धावा.
गोलंदाजी : जॉन्सन ६-१-६८-०, स्टार्क ९-०-२८-६, कमिन्स ६१-०-३८-२, मिशेल१-०-११-०, मॅक्सवेल १-०-७-१.

 

Web Title: Hosts New Zealand in quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.