३६ वर्षांनंतर इतिहास रचण्यास हॉकी संघ सज्ज
By Admin | Updated: August 5, 2016 03:47 IST2016-08-05T03:47:20+5:302016-08-05T03:47:20+5:30
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ ३६ वर्षांनंतर रिओ आॅलिम्पिकमध्ये नवीन इतिहास रचण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवणार आहे.

३६ वर्षांनंतर इतिहास रचण्यास हॉकी संघ सज्ज
रियो डी जेनेरो : भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ ३६ वर्षांनंतर रिओ आॅलिम्पिकमध्ये नवीन इतिहास रचण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवणार आहे. पुरुष संघाने याआधीचे आॅलिम्पिक पदक १९८० मॉस्को आॅलिम्पिकमध्ये जिंकले होते. तसेच महिला हॉकी संघही अखेरच्या वेळी आॅलिम्पिकमध्ये मॉस्को येथेच खेळला होता.
रियोत भारताची सलामीची लढत शनिवारी आयर्लंड संघाविरुद्ध होणार आहे. जूनमध्ये स्पेनमध्ये झालेल्या सहा देशांच्या स्पर्धेत आयर्लंडवरील मिळालेल्या विजयाने भारताचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेशने म्हटले, की आयर्लंडच्या खेळाडूंनी युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यांच्याविषयी आधीच अंदाज लावणे कठीण आहे. मैदानात चेंडूंवर त्यांची पकड मजबूत आहे. ही लढत सोपी नसून आम्हाला सर्वस्व पणाला लावण्याची आवश्यकता आहे. खेळाच्या या महाकुंभात मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, याविषयी मला कधीही आशा नव्हती. माझे उद्दिष्ट आपल्या देशासाठी पदक जिंकून ३६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचा आहे.
श्रीजेश म्हणाला, ‘‘माझे पहिले काम हे गोल वाचवणे आहे आणि दुसरे काम संघाला एकजूट करून चांगले खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. तिसरे काम हे एक गोलरक्षक म्हणून संघात आत्मविश्वास निर्माण करणे हे आहे. हे तिन्ही काम एक कर्णधार करू शकतो, असे मला वाटते आणि त्यामुळे माझ्यावर याचे कोणतेही अतिरिक्त दडपण नाही. सर्वच खेळाडूंना दबावाशिवाय आपला स्वाभाविक खेळ करण्याची आवश्यकता आहे.’’
जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असणाऱ्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक नील हॉवगूड म्हणाले, ‘‘संघातील खेळाडू आपल्या पहिल्या आॅलिम्पिक स्पर्धेविषयी उत्साहित आहेत. अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती आणि तेथे आम्ही काही सामनेदेखील जिंकले. त्याजोरावर आम्ही आॅलिम्पिकमध्ये कामगिरी उंचावण्याचा पूर्ण प्रयत्न करू.’’
>हॉकीत चांगल्या कामगिरीची प्रशिक्षकांना आशा
संघ या वेळी आॅलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करील आणि ३६ वर्षांचा आपला पदकांचा दुष्काळ संपविण्याच्या निर्धाराने मैदानात पाऊल ठेवेल, अशी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकांना आशा आहे.
न्यूझीलंडविरुद्ध मैत्रीपूर्ण लढतीनंतर प्रशिक्षक रोलेंट ओल्टमन्स म्हणाले, ‘‘आम्ही स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज आहोत आणि रिओ आॅलिम्पिकमध्ये आम्हाला फक्त विजयच हवा आहे. आजच्या आधुनिक खेळांत तुम्हाला विजयापेक्षा काही कमी मान्यच नसते.’’