बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

By Admin | Updated: March 5, 2015 13:02 IST2015-03-05T11:55:43+5:302015-03-05T13:02:02+5:30

वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशने स्कॉटलंडचे ३१९ धावांचे लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ गडी व ११ चेंडू राखून विजय मिळवला.

Historical victory over Scotland in Scotland | बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

ऑनलाइन लोकमत 

नेल्सन, दि. ५ - वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशने स्कॉटलंडचे ३१९ धावांचे लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ गडी व ११ चेंडू राखून विजय मिळवला.  वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशने पहिल्यांदाच कर वन डेत इतिहासात दुस-यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 
गुरुवारी वर्ल्डकपमध्ये बांग्लादेश आणि स्कॉटलंड हे संघ आमने सामने होते. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंडचा सलामीवीर कायल कोएत्झरने १३४ चेंडूत १५६ धावांची तडाखेबाज खेळी करत संघाला ३०० चा टप्पा ओलांडून दिला. त्याला प्रिस्टन मोमसेन ३९ धावा आणि मॅट मॅचन ३५ धावा यांनी मोलाची साथ दिली. स्कॉटलँडने ५० षटकांत ३१८ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. बांग्लादेशतर्फे तस्किन अहमदने सर्वाधिक ३ तर नासीर हुसेनने दोन विकेट घेतल्या. 
स्कॉटलंडचे ३१९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशची सलामीची जोडी अपयशी ठरली. सौम्य सरकार अवघ्या २ धावांवर बाद झाल्याने बांग्लादेशची अवस्था १ बाद ५ धावा अशी होती. मात्र त्यानंतर तमिम इक्बालने (९५ धावा) आणि महमुदूल्लाह (६२ धावा) या जोडीने १३९ धावांची भागीदारी करत विजयाचा पाय रचला. ही जोडी परतल्यावर मोहम्मद रहीम (६० धावा) शकीब अल हसन (नाबाद ५२ धावा) यांनी संघाला विजयाच्या समीप नेले. मोहम्मद रहीम बाद झाल्यावर शब्बीर रेहमानने नाबाद ४२ धावांची खेळी करत हसनला साथ दिली. शकीब अल हसनने  ४८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत संघाला दिमाखदार विजय मिळवून दिली. बांग्लादेशच्या चार फलंदाजांनी मौल्यवान अर्धशतक ठोकत सांघिक कामगिरीचा उत्तम नमूनाच सादर केला.  स्कॉटलंडचा सलामीवीर कोएत्झरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. लिंबू टिंबू संघाची लढत म्हणून या सामन्याकडे बघितले जात असले तरी या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण ६४० धावा केल्या. वर्ल्डकपमध्ये ऐवढ्या धावा झालेला हा आठवा सामना ठरला आहे. 
बांग्लादेश पदतालिकेत चौथ्या स्थानावर आला असून स्कॉटलंडला अजूनही वर्ल्डकपमध्ये विजयाची प्रतिक्षा आहे. स्कॉटलंडने आत्तापर्यंत वर्ल्डकपमधील सर्व सामने गमावले आहे. बांग्लादेशची पुढील लढत इंग्लंड व बलाढ्य न्यूझीलंडसोबत आहे. यापैकी एका सामन्यात विजय मिळवल्यास बांग्लादेश क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरेल. 

Web Title: Historical victory over Scotland in Scotland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.