भारताच्या सायकलपटूंची ऐतिहासिक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 11:22 PM2020-02-06T23:22:14+5:302020-02-06T23:22:34+5:30

पहिल्यांदाच मिळवला जागतिक स्पर्धेत प्रवेश

Historical performance of Indian cyclists | भारताच्या सायकलपटूंची ऐतिहासिक कामगिरी

भारताच्या सायकलपटूंची ऐतिहासिक कामगिरी

googlenewsNext

मुंबई : भारताच्या सायकलपटूंनी गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली. या शानदार कामगिरीमुळे आता जगातील अव्वल १८ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा समावेश होईल.
एसो एलबेन (१९ वर्षीय), जेम्स सिंग (१९), रोजित सिंग (१८) आणि रोनाल्डो सिंग (१८) या युवा सायकलपटूंचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने गुरुवारी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) ट्रॅक सायकलिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली. ही स्पर्धा जर्मनीची राजधानी बर्लिन येथे २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीमध्ये रंगेल. दरम्यान, जागतिक स्पर्धेत भारतीय पुरुष जरी पहिल्यांदाच सहभागी होणार असले, तरी याआधीच या स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकलेला आहे.
याआधी २०१६ साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताची महिला सायकलपटू देबोराह हेरॉल्ड हिने महिलांच्या ५०० मीटर अंतराच्या चाचणी स्पर्धेतून पात्रता मिळवली होती. यानंतर भारताचा या स्पर्धेत दुसºयांदा, तर सांघिक गटात पहिल्यांदाच समावेश होईल. विशेष म्हणजे आगामी टोकियो ऑलिम्पिक तिकीट मिळविण्यासाठी या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे ठरणार असल्याने भारतीयांसाठी ही स्पर्धा मोठी संधी ठरू शकते.
त्याचवेळी, भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक आर. के. शर्मा यांनी मात्र आमचे लक्ष्य २०२४ सालची ऑलिम्पिक स्पर्धा असून जागतिक स्पर्धेतील प्रवेश त्यादृष्टीने टाकलेले पहिले मोठे पाऊल असल्याचे सांगितले. शर्मा यांनी सांगितले, ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी मिळविलेली पात्रता युवा खेळाडूंनी मिळविलेले खूप मोठे यश आहे. या स्पर्धेत आणि यंदाच्या वर्षात संघाची एकूण कामगिरी कशी होणार याविषयी आम्हाला कोणतीच चिंता नाही. आमचे मुख्य लक्ष्य २०२४ सालच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे असून, त्यादृष्टीने आमचे भक्कम पाऊल पडले आहे.’

Web Title: Historical performance of Indian cyclists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.