भारताच्या हिमांशूची द्वितीय स्थानी झेप

By Admin | Updated: June 9, 2014 03:44 IST2014-06-09T03:44:08+5:302014-06-09T03:44:08+5:30

भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर (आय.एम.) हिमांशू शर्माने अर्मेनियाच्या हारुत्जुन्यन गेवोर्ग याचा निर्णायक पराभव

Himanshu's second place in the jump | भारताच्या हिमांशूची द्वितीय स्थानी झेप

भारताच्या हिमांशूची द्वितीय स्थानी झेप

मुंबई : भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर (आय.एम.) हिमांशू शर्माने अर्मेनियाच्या हारुत्जुन्यन गेवोर्ग याचा निर्णायक पराभव करताना ८व्या फेरीअखेर ६.५ गुणांची कमाई करताना ७व्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय स्थानावर झेप घेतली. त्याचवेळी बलाढ्य व विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या जॉर्जियाच्या ग्रॅण्डमास्टर (जीएम) पंत्सुलेया लेवान याने विजयी घोडदौड कायम राखताना सर्वाधिक ७ गुणांसह अग्रस्थान कायम ठेवले.
कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत हिमांशूने धक्कादायक निकाल लावताना अर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर गेवोर्गला नमवले. हिमांशूने पारंपरिक भारतीय बचावात्मक पद्धतीने डावाला सुरुवात करताना सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण राखले. छोट्या-छोट्या, परंतु महत्त्वाच्या चाली रचत त्याने घोडा गमावताना चार प्यादे जिंकताना आगेकूच केली. ४८व्या चालीमध्ये प्रतिस्पर्धी घोडा जिंकताना उंटाऐवजी हत्तीला गमावण्याची चुकीची खेळी हिमांशूने केली. यामुळे सामना विनाकारण ७६व्या चालीपर्यंत रंगला. मात्र पूर्णपणे वर्चस्व राखलेल्या हिमांशूच्या आक्रमणाला रोखण्यात गेवोर्गला अपयश आले.
तत्पूर्वी पहिल्या बोर्डवर झालेल्या लढतीत अग्रस्थानी असलेल्या जॉर्जियाच्या लेवानने विजयी धडाका कायम राखताना ७ गुणांसह स्पर्धेत भक्कम आघाडी घेतली. भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर स्वयम्स मिश्राचे बचाव भेदताना लेवानने तुफान आक्रमण करताना ४९व्या चालीत विजय मिळवला. यानंतर दुसऱ्या बोर्डवर झालेल्या सामन्यात भारताच्या श्याम निखिलने झुंजार बेलारुसचा ग्रँडमास्टर अलेक्सांड्रोव्ह अलेक्सेजला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. ५४ चालींपर्यंत रंगलेल्या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या राजांना शह देण्याचा प्रयत्न केला. अखेर दोघांनी बरोबरी मान्य करताना अर्धा गुण वाटून घेत आगेकूच केली.

Web Title: Himanshu's second place in the jump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.