मायकल ऍडम्सवरील विजयासह हरिकृष्णची आघाडी
By Admin | Updated: March 26, 2017 14:46 IST2017-03-26T11:13:52+5:302017-03-26T14:46:19+5:30
भारताच्या पेंटेला हरिकृष्णने शेन्जेन लोन्गांग मास्टर्स बुद्धिबळ २०१७ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत काळ्या मोहऱ्यांनी खेळताना मायकल ऍडम्सला हरविले.

मायकल ऍडम्सवरील विजयासह हरिकृष्णची आघाडी
केदार लेले / ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 26 - भारताच्या पेंटेला हरिकृष्णने शेन्जेन लोन्गांग मास्टर्स बुद्धिबळ २०१७ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत काळ्या मोहऱ्यांनी खेळताना मायकल ऍडम्सला हरविले. या विजयामुळे त्याने दीड गुणांसह आघाडी घेतली आहे. तर, अनिष गिरी. वि. डिंग लिरेन आणि स्विडलर वि.यू यांगी यांच्यातील डाव बरोबरीत सुटले.
मायकल ऍडम्स पराभूत .वि. पेंटेला हरिकृष्ण
मायकल ऍडम्स आणि हरिकृष्ण यांच्यातील डाव कॅटलन पद्धतीने झाला. हरिकृष्णला संभ्रमात टाकण्यासाठी मायकल ऍडम्स ने १६व्या खेळीवर वजिराची नाविन्यपूर्ण चाल रचली. हरिकृष्णने कल्पकतेचा वापर केला आणि मोहऱ्यांची अदलाबदल करीत, डावात समानता टिकवून ठेवली.
डावात समानता दिसूनही मायकल ऍडम्सला त्याची बाजू वरचढ वाटत होती. पण त्याचा अनुमान चुकला आणि त्याने अनुक्रमे ३६व्या आणि ३७व्या खेळींवर वजिराच्या चुकीच्या चाली रचल्या. या चुकांचा फायदा उठवित हरिकृष्णने डावाचे पारडे आपल्याकडे झुकवले. वजिरा-वजिरी झाल्यावर हरिकृष्णने, आपल्या अश्वाने शह देत मायकल ऍडम्सच्या उंटाचा अडसर दूर केला.
डावाच्या अंतिम स्थितीत यंत्राप्रमाणे अचूक चाली रचत हरिकृष्णने विजयी गुण वसूल केला! या विजयामुळे दुसऱ्या फेरी नंतर त्याने दीड गुणांसह आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या फेरीचे सविस्तर निकाल:
मायकल ऍडम्स पराभूत .वि. पेंटेला हरिकृष्ण
अनिष गिरी. बरोबरी वि. डिंग लिरेन
स्विडलर बरोबरी वि.यू यांगी