गप्टीलच्या ३० चेंडूत ९३ धावा, न्यूझीलंडने श्रीलंकेला लोळवले
By Admin | Updated: December 28, 2015 11:07 IST2015-12-28T10:53:56+5:302015-12-28T11:07:20+5:30
मार्टिन गप्टीलच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेचे ११७ धावांचे लक्ष्य अवघ्या ८.२ षटकात पूर्ण केले.

गप्टीलच्या ३० चेंडूत ९३ धावा, न्यूझीलंडने श्रीलंकेला लोळवले
ऑनलाइन लोकमत
ख्राईस्टचर्च, दि. २८ - मार्टिन गप्टीलच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेचे ११७ धावांचे लक्ष्य अवघ्या ८.२ षटकात पूर्ण केले आणि दहागडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेचा डाव न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर अवघ्या ११७ धावात संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सलामीवीर गप्टीलने श्रीलंकन गोलंदाजांचा अक्षरक्ष पालापाचोळा केला.
पहिल्या चेंडूपासून गप्टील श्रीलंकन गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३० चेंडून नाबाद ९३ धावा तडकवल्या. या त्याच्या खेळीत नऊ चौकार आणि आठ षटकाराचा समावेश होता. समोरच्या टोकाकडून फलंदाजी करणा-या लॅथमने नाबाद १७ धावा केल्या. त्यावरुन गप्टीलच्या वादळी खेळीची कल्पना येते.
गप्टीलने १३ चेंडूत ४६ धावा फटकावल्या. तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सचा १६ चेंडूतील अर्धशतकाचा विक्रम मोडण्याच्या जवळ होता. मात्र त्याने नुवान कुलसेखराचे दोन यॉर्कर खेळून काढले. गप्टीलला तो अर्धशतकाच्या विक्रमाच्याजवळ आहे याची कल्पनाच नव्हती. माझ्या विक्रमापेक्षा संघ जिंकला याचा आनंद आहे असे गप्टीलने सांगितले.