भारताचा डी गुकेश बनला बुद्धीबळाचा नवा King; चीनी ग्रँडमास्टरला चारली पराभवाची धूळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 21:13 IST2024-12-12T21:13:07+5:302024-12-12T21:13:39+5:30

Gukesh D World Chess Champion: भारताचा युवा बुद्धीबळपटू डी गुकेशने सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान पटकावला आहे.

Gukesh D World Chess Champion: Brilliant performance by India's D Gukesh; defeated Chinese Grandmaster in last round | भारताचा डी गुकेश बनला बुद्धीबळाचा नवा King; चीनी ग्रँडमास्टरला चारली पराभवाची धूळ...

भारताचा डी गुकेश बनला बुद्धीबळाचा नवा King; चीनी ग्रँडमास्टरला चारली पराभवाची धूळ...

Gukesh D World Chess Champion: भारताचा युवा स्टार डी गुकेश (Gukesh D) बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली, पण अखेरला 18 वर्षीय गुकेशने सामना आपल्या नावावर केला. 

सिंगापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनचा डिंग आणि भारताचा गुकेश यांच्यात चुरशीची लढत रंगली. सामन्याच्या शेवटच्या फेरीत डिंगने एक चूक केली अन् तिथेच गुकेशने संधी साधत सामना आपल्या नावावर केला. गुकेशने चिनी ग्रँडमास्टरचा पराभव करत 7.5 - 6.5 अशा फरकाने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा गुकेश, विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या विजयाचे बक्षीस म्हणून गुकेशला 18 कोटी रुपयेही मिळणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 
पीएम मोदींनी त्यांच्या X अकाउंटर डी गुकेशचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की, गुकेशच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. गुकेशने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी हे यश संपादन केले आणि सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला. हे ऐतिहासिक आणि अनुकरणीय आहे. गुकेशच्या विजयाने केवळ बुद्धिबळाच्या इतिहासातच नाव नोंदवले नाही, तर लाखो तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा दिली आहे.

संपूर्ण भारताची मान उंचावली- राहुल गांधी
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेशचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, गुकेश, तू संपूर्ण भारताची मान उंचावली आहेस. वयाच्या 18 व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनणे ही अभूतपूर्व कामगिरी आहे. तुझी जिद्द आणि मेहनत आठवण करुन देते की, जिद्दीने काहीही शक्य आहे. अभिनंदन, चॅम्पियन!
 

Web Title: Gukesh D World Chess Champion: Brilliant performance by India's D Gukesh; defeated Chinese Grandmaster in last round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.