श्रीलंकेचा शानदार विजय
By Admin | Updated: March 2, 2015 00:59 IST2015-03-02T00:59:00+5:302015-03-02T00:59:00+5:30
अनुभवी कुमार संगकारा व युवा लाहिरू तिरिमाने यांच्या वैयिक्तक शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला

श्रीलंकेचा शानदार विजय
वेलिंग्टन : अनुभवी कुमार संगकारा व युवा लाहिरू तिरिमाने यांच्या वैयिक्तक शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला आणि विश्वकप क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीच्या दिशेने कूच केली. इंग्लंडतर्फे जो रुटची (१२१) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना इंग्लंडने रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद ३०९ धावांची दमदार मजल मारली. पण इंग्लंडचे गोलंदाज व क्षेत्ररक्षक धावसंख्येचा बचाव करण्यात सपशेल अपयशी ठरले. संगकारा (नाबाद ११७) अणि तिरिमाने (नाबाद १३९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी २१२ धावांची अभेद्य भागीदारी करीत श्रीलंकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बाद फेरी गाठण्यासाठी इंग्लंडपुढे आता ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेने विजयासाठी आवश्यक धावा ४७.२ षटकांत १ गडी गमावीत पूर्ण केल्या. सलामी लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या श्रीलंका संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. श्रीलंका संघाने ४ सामन्यांत ६ गुणांची कमाई केली आहे. चार सामने खेळणाऱ्या इंग्लंडच्या खात्यावर केवळ २ गुणांची नोंद आहे. इंग्लंडला अद्याप बाद फेरी गाठण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवावा लागेल आणि अन्य सामन्यांचे निकाल अनुकूल ठरावे, यासाठी प्रार्थना करावी लागेल.
संगकाराने कारकीर्दीतील २३ वे शतक झळकावले. त्याने ८६ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार व २ षटकार लगाविले. संगकाराने ७० चेंडूंमध्ये शतक झळकाविताना श्रीलंकेतर्फे विश्वकप स्पर्धेत सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. २५ वर्षींय तिरिमाने या स्पर्धेत शतक झळकाविणारा श्रीलंकेचा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. त्याने १४३ चेंडू खेळताना १३ चौकार व २ षटकार लगाविले.