फिडे प्रमुखांनी राजीनामा द्यावा; ग्रँडमास्टर कार्लसनची मागणी, जागतिक बुद्धिबळात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:13 IST2025-02-05T11:12:26+5:302025-02-05T11:13:13+5:30
जागतिक बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) प्रमुख अर्कडी डोरकोविच यांच्याविरोधात गंभीर आरोप

फिडे प्रमुखांनी राजीनामा द्यावा; ग्रँडमास्टर कार्लसनची मागणी, जागतिक बुद्धिबळात काय घडलं?
Magnus Carlsen FIDE President Arkady Dvorkovich Controversy : नवी दिल्ली: जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याने जागतिक बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) प्रमुख अर्कडी डोरकोविच यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'खेळाडूंवर जबरदस्ती करणे, सत्तेचा दुरुपयोग आणि दिलेले वचन न पाळणे,' असे आरोप डोरकोविच यांच्यावर लावत कार्लसन याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कार्लसन याने जर्मनीचे उद्योगपती जॉन हेन्रीक यांच्यासह मिळून 'फ्रीस्टाइल बुद्धिबळ टूर' स्पर्धेची स्थापना केली असून, त्याने यासाठी फिडेसोबत करार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये अडचणी आल्यानंतर कार्लसनने डोरकोविच यांच्यावर टीका करत त्यांनी पद सोडावे, अशी मागणी केली.
या टूरमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना अधिकृत जागतिक अजिंक्यपद सत्रासाठी कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करण्याबाबत स्वाक्षरी करण्यास फिडेने सांगितले होते. फ्रीस्टाइल टूरने फिडेच्या प्रतिक्रियेवर टीका केली असून, त्याचवेळी त्यांनी आपल्या 'ग्रँड फिनाले'साठी जागतिक अजिंक्यपद शब्दाचा वापर न करण्याबाबत सहमतीही दर्शविली.
न्यूयॉर्कमध्ये रॅपिड आणि ब्टिझ स्पर्धेतील माझ्या सहभागासाठी डोरकोविच यांनी १९ डिसेंबरला माझ्या वडिलांना संदेश पाठविला होता. त्यात त्यांनी फिडे आणि फ्रीस्टाइलमध्ये जी काही चर्चा होईल, त्याने खेळाडू प्रभावित होणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी असेही सांगितले होते की, जर फिडे परिषदेत त्यांच्या बोलण्यास महत्त्व दिले गेले नाही, तर ते आपले पद सोडतील. आता त्यांनी आपले वचन मोडले आहे. मग, डोरकोविच आता राजीनामा द्याल का तुम्ही?
मॅग्नस कार्लसन, ग्रँडमास्टर, नॉर्वे