सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची कॅन्सरशी झुंज; क्रीडा मंत्री धावले मदतीला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:03 IST2020-02-13T16:00:36+5:302020-02-13T16:03:33+5:30
बँकॉक येथे 1998साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघानं 7 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची कमाई केली. या सात खेळाडूंमध्ये बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकणारा डिंगको सिंग कॅन्सरशी झुंज देत आहे.

सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची कॅन्सरशी झुंज; क्रीडा मंत्री धावले मदतीला!
बँकॉक येथे 1998साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघानं 7 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची कमाई केली. या सात खेळाडूंमध्ये बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकणारा डिंगको सिंग कॅन्सरशी झुंज देत आहे. 28 जानेवारीपासून तो कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. पण, त्याच्याकडे योग्य उपचार घेण्यासाठी पैसा नसल्यानं त्याची फरफट होत होती. पण, अखेरीस केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी मणिपूरच्या या बॉक्सरचा आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिंगको सिंगच्या उपचाराचा सर्व खर्च आता क्रीडा मंत्रालय उचलणार असल्याची माहिती, रिजीजू यांनी दिली. 42 वर्षीय डिंगकोला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना रिजीजू यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साई) ला दिल्या आहेत. त्यानुसार साईच्या अधिकाऱ्यांनी डिंगकोच्या उपचाराचा सर्व अहवाल क्रीडा मंत्र्यांना पाठवला आणि त्यांनी तो तात्काळ मान्यही केला. त्यामुळे आता हॉस्पिटल्सची सर्व बिलं थेट साईकडून भरली जाणार आहेत.
यापूर्वी दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेला कुस्तीपटू सुशील कुमार, दोन वर्ल्ड कप नावावर असलेला गौतम गंभीर यांनीही डिंगकोला आर्थिक मदत केली आहे. डिंगकोला अर्जुन आणि पद्म श्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर Institute of Liver and Biliary Sciences (ILBS) येथे उपचार सुरु आहेत. आर्थिक मदत मिळवण्यासाठी डिंगको दारोदार भटकत होता. 1998च्या आशियाई स्पर्धेत डिंगकोनं 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.
याआधी रिजीजू यांनी ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल आणि वर्ल्ड कप/जागतिक अजिंक्यपद ( ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धेतील खेळ) स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंसाठी पेन्शन योजना जाहीर केली होती. त्याच्यानुसार खेळाडूंना प्रतिमहिना 12 ते 20 हजार रुपये मिळणार आहेत.