The golden age of the Indians; Dominance of Aishwarya Tomar | भारतीयांचा सुवर्ण धडाका; ऐश्वर्य तोमरचा दबदबा

भारतीयांचा सुवर्ण धडाका; ऐश्वर्य तोमरचा दबदबा

नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या आयएसएफएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मी. पिस्तूल गटात भारताने एकहाती वर्चस्व राखताना तिन्ही पदकांवर कब्जा केला. यावेळी, चिंकी यादवने सर्वांना प्रभावित करीत राही सरनोबत आणि मनू भाकर या अनुभवी नेमबाजांना मागे टाकत सुवर्णवेध घेतला. त्याचवेळी, पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन गटात भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने सुवर्णपदकावर नाव कोरले. 

या स्पर्धेत झालेल्या कामगिरीद्वारे भारतीय गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. २३ वर्षीय चिंकीने अनुभवी राही सरनोबतला कडवी झुंज देत ३२ गुणांसह बरोबरी साधली. यानंतर झालेल्या शूट-ऑफमध्ये चिंकीने जबरदस्त एकाग्रता दाखवताना राहीला ४-३ असे नमवले. या शानदार कामगिरीसह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या ९ झाली आहे. १९ वर्षीय मनूला एलिमिनेशन फेरीत २८ गुणांसह कास्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या तिन्ही नेमबाजांनी याआधीच टोकियो ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे. 

२०१९ साली १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकत चिंकीने टोकियोचे तिकीट मिळविले होते. पहिल्या २० नेममध्ये चिंकी १४ गुणांसह आघाडीवर होती, तर मनू १३ गुणांसह मागे होती. यानंतर चिंकीने पूर्ण वर्चस्व मिळवताना २१ गुणांसह आघाडी वाढविली, तर राहीने जबरदस्त पुनरागमन करीत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले. 

ऐश्वर्य तोमरचा दबदबा
भारताचा युवा नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावीत भारताचे अव्वल स्थान अधिक मजबूत केले. भोपाळच्या या २० वर्षीय नेमबाजाने ४६२.५ गुणांचा वेध घेत अव्वल स्थान पटकावले. त्याच्या धडाक्यापुढे हंगेरीचा स्टार नेमबाज इस्तवान पेनी (४६१.६) आणि डेन्मार्कचा स्टेफेन ओलसेन (४५०.९) यांना अनुक्रमे रौप्य व कास्य पदकावर समाधान मानावे लागले. 

अंतिम फेरीत ऐश्वर्यसोबत अनुभवी संजीव राजपूत आणि नीरज कुमार यांनीही प्रवेश केला होता. मात्र, दोघेही अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानी राहिले. २०१९ साली झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कास्य पदक जिंकत ऐश्वर्यने याआधीच टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले होते

नवी दिल्लीत सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीयांनी अव्वल स्थान पटकावत आपल्यवरील भरवसा अधिक मजबूत केला आहे. भारताने कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आतापर्यंत ९ सुवर्ण, ५ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण १९ पदकांची लयलूट करत अव्वल स्थान काबिज केले आहे.

Web Title: The golden age of the Indians; Dominance of Aishwarya Tomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.