बॉक्सर डिंकोसिंगला दिल्लीत हलवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 00:16 IST2020-04-22T00:16:02+5:302020-04-22T00:16:42+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता बॉक्सर डिंकोसिंग यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त

बॉक्सर डिंकोसिंगला दिल्लीत हलवणार
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता बॉक्सर डिंकोसिंग यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त असून त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यासाठी २५ एप्रिलला दिल्लीत आणण्याचा निर्णय भारतीय बॉक्सिंग महासंघाने घेतला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे डिंकोवर निर्धारित रेडिएशन थेरपी होऊ शकली नव्हती.
इम्फाळचा रहिवासी असलेल्या डिंकोवर १५ दिवसांआधी रेडिएशन थेरपी होण्याची गरज होती; मात्र लॉकडाऊनमुळे तो दिल्लीला पोहोचू शकला नाही. बीएफआयचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांनी दिलेल्या माहितीनुसार रेडिएशन थेरपीसाठी डिंकोला एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणण्यात येणार आहे. याआधी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मणिपूर सरकारला डिंकोच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास सांगितले होते. अर्जुन आणि पद्म पुरस्काराचा मानकरी डिंको गेल्या अनेक महिन्यांपासून अंथरुनावर आहे.