गोलकीपरच ठरले ‘हीरो’
By Admin | Updated: July 3, 2014 04:37 IST2014-07-03T04:37:14+5:302014-07-03T04:37:14+5:30
ब्राझीलमध्ये सुरू असलेला फिफा फुटबॉल विश्वचषक सध्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे़

गोलकीपरच ठरले ‘हीरो’
रिओ दि जेनेरिओ : ब्राझीलमध्ये सुरू असलेला फिफा फुटबॉल विश्वचषक सध्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे़ आतापर्यंत अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी, ब्राझीलचा नेयमारसह अन्य खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले असले, तरी आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये अनेक संघांसाठी गोलकीपरच हीरो ठरले आहेत़
आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट बचाव करीत गोलकीपर गुलेरमो ओचोआ, ज्युलिओ सिजर, टीम हॉवर्ड, किलोर नवास, अलिरजा हकिकी यांनी फुटबॉल जगतात आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे़ मंगळवारी झालेल्या सामन्यांत बेल्जियमने जरी अमेरिकेला पराभूत केले असले तरी, या लढतीत अमेरिकेचे गोलकीपर टीम हॉवर्ड हा संघाचा नायक राहिला़ या लढतीत त्याने १६ वेळा गोल होता होता वाचविले़ तोच सामन्याचा मानकरी ठरला़ हॉवर्डने अमेरिका व पोर्तुगाल या लढतील २-२ ने बरोबरीत सुटलेल्या सामन्यातही उत्कृष्ट कामगिरी केली होती़ या बळावर तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता़
कोस्टारिका संघाने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली़ या संघाला फेरीत पोहोचविण्याचे श्रेय हे गोलकीपर किलोर नवास यालाच जाते़ तोसुद्धा वर्ल्डकपमध्ये २ वेळा सामनावीर पुस्काराचा मानकरी ठरला आहे़ ग्रीसविरुद्ध कोस्टारिकाच्या पेनल्टी शूट आऊटवरील ५-३ अशा विजयात गोलकिपर नवास हाच खरा नायक ठरला़ त्याने इंग्लंडविरुद्धच्या साखळी लढतीतही उत्कृष्ट प्रदर्शन करून सामना ०-० असा बरोबरीत सोडविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती़ जर्मन संघाने अल्जेरियाला पराभूत करून अंतिम ८ संघांत जागा मिळविली़ मात्र, त्यांच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाचा गोलकिपर राईस मबोली याची प्रशंसा केली़ फिफानेही त्या लढतीत मबोलीला सामनावीर खेळाडू म्हणून निवडले होते़