आगामी आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे ध्येय - राही सरनोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:33 IST2018-09-24T02:33:43+5:302018-09-24T02:33:59+5:30
२०२० च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे राहीने यावेळी सांगितले.

आगामी आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे ध्येय - राही सरनोबत
पुणे - शालेय जीवनात केवळ २५ गुणांच्या उद्देशाने खेळात सहभागी होऊ नका. खेळ नि:स्वार्थ वृत्तीने खेळा. कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश आपोआप तुमच्या पायावर लोळण घेईल, असा सल्ला आशियाडमध्ये नेमबाजीत सुवर्णवेध घेणारी महाराष्ट्रकन्या नेमबाज राही सरनोबत हिने शनिवारी युवा खेळाडूंना दिला. तसेच २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे राहीने यावेळी सांगितले.
जकार्ता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्याचा राहीचा बालगंधर्व रंगमंदिर येथे सत्कार करण्यात आला. कर्मभूमीतील या सत्कारामुळे ती भारावली होती. युवा खेळाडूृंशी संवाद साधताना ती म्हणाली, दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड द्या. महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा फडकताना बघायचे ध्येय उराशी बाळगा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. स्वार्थासाठी खेळाची निवड केली तर क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडणार नाही, हे लक्षात ठेवा.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, चित्रपट दिग्दर्शिका समृद्धी जाधव, विधान परिषद सचिव उत्तमसिंग चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. विठ्ठल जाधव, मोहन राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान उपस्थित होते. शिरीन सय्यद हिने सूत्रसंचालन केले.
कर्मभूमीत होणारे स्वागत स्पेशल
माझ्या कारकिर्दीची जडणघडण पुण्यातच झाली. जन्मभूमी कोल्हापूर असली तरी कर्मभूमी पुणे होय. कर्मभूमीतील हा सत्कार माझ्यासाठी स्पेशल आहे. यामुळे मी भारावून गेले आहे, अशा शब्दात राहीने पुण्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी राहीचे वडील जीवन सरनोबत व आई प्रभा हे देखील उपस्थित होते. २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे राहीने यावेळी सांगितले.