नव्या इनिंगमध्ये लक्ष्य हॉकी वर्ल्ड लीग
By Admin | Updated: March 29, 2017 01:16 IST2017-03-29T01:16:11+5:302017-03-29T01:16:11+5:30
‘सप्टेंबर २०१६मध्ये हॉकीतून निवृतीची घोषणा केली. पण त्यानंतरचे सातमहिने मी शांतपणे झोपू शकले नाही. कोठे लक्षच लागत नव्हते.

नव्या इनिंगमध्ये लक्ष्य हॉकी वर्ल्ड लीग
शिवाजी गोरे / पुणे
‘सप्टेंबर २०१६मध्ये हॉकीतून निवृतीची घोषणा केली. पण त्यानंतरचे सातमहिने मी शांतपणे झोपू शकले नाही. कोठे लक्षच लागत नव्हते. माझा जीव की प्राण असलेली हॉकीची स्टिक सतत खुणावत होती.त्यामुळे निवृत्तीचा विचार सोडून संघात पुन्हा प्रवेश केला आहे. हॉकी वर्ल्ड लिगमध्ये उत्तुंग कामगिरी हेच माझे लक्ष्य आहे, असे भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार रितू राणी हिने सांगत होती. रितूने पुन्हा एकदा संघात प्रवेश करत नवी इनिंग सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ती ‘लोकमत’शी बोलत होती.
भारतीय महिला हॉकी संघांची मिड फिल्डर असलेल्या रितूने सात महिन्यांपूर्वी हॉकीतून निवृत्ती जाहीर केली होती. परंतु, हॉकीशी असलेल्या ऋणानुबंधामुळे खेळ सोडणे शक्यच नव्हते. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना रितू म्हणाली, ‘‘ वयाच्या ९व्या वर्षापासून भावाबरोबर हॉकी खेळत आले आहे. त्यामुळे हॉकीची स्टिक म्हणजे माझा जीव की प्राण आहे. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात घेतलेला निवृत्तीचा निर्णय माझ्यासाठी फार अवघड होता. त्या काळातही माझा थोडाफार सराव सुरू होता. पण नंतर लक्षात आले की मी हॉकीपासून दूर राहूच शकत नाही. हॉकीची स्टिक सतत मला खुणावत होती. माझ्या मानसिकतेची कल्पना पती आणि घरच्यांना आली. त्यांनी पुन्हा एकदा माझ्या हातात हॉकीची स्टिक दिली.
भारतीय महिला संघात परण्याचा निर्णय झाला. मुख्य म्हणजे हॉकी इंडियाला मी पाठविलेल्या मेलला त्यांचे सकारात्मक उत्तर आल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी लगेच प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यास सांगितले.
1- पतियाळा येथे हॉकीचे बाळकडू घेण्यास सुरुवात केलेली रितू म्हणाली, ‘‘कॅनडा येथील पश्चिम व्हँक्युअर येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारतासह बेलारूस, कॅनाडा, मेक्सिको, चिली, त्रिनिदाद अँड टोबॅगो, उरुग्वे हे संघ सहभागी असतील. स्पर्धेच्या ठिकाणी भारतीय संघ आधीच जात आहे, कारण तेथील वातावरणाशी जुळून घेण्यासाठी.’’
2 - बंगळुरू येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शक एरिक वॉनिकस, सजोरड मारीजीन आणि हाय परफॉर्मन्स संचालक डेव्हिड जॉन यांनी संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून आवश्यक असलेले बदल केले आहेत. सरावादरम्यान त्यांनी तंदुरुस्ती आणि टेक्निककडे जास्त लक्ष दिले आहे. परदेशात खेळताना खेळ जलद करावा लागतो, त्यासाठी खेळाडूंमध्ये स्टॅमिना भरपूर लागतो. त्या दृष्टीने मार्गदर्शकांनी सरावाचे नियोजन केले होते.
3 - सरावामध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी योगावरसुद्धा भर दिला गेला आहे. एकंदरीत, संघातील खेळाडूंची तयारी ज्या पद्धतीने झाली आणि आमच्या नियोजनानुसार जर संघातील प्रत्येक खेळाडूचा खेळ होत गेला, तर आम्ही नक्कीच हॉकी वर्ल्ड लीगमध्ये पहिल्या क्रमांकावर असू असा विश्वास वाटतो.
आमचे पहिले लक्ष्य हॉकी वर्ल्ड लीगमध्ये चांगली कामगिरी करणे, हे असेल. सध्या संघात पूनम राणी, वंदना कटारिया, दीपिका राणी, रेणुका यादव, सुनीता लाक्रा, दीप ग्रेस लक्का, नवज्योत कौर, सविता या उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यामुळे भारतीय महिला संघ १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड लीग स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी करेल. -रितू राणी