टीम इंडियाला वेळ द्या
By Admin | Updated: October 7, 2014 03:08 IST2014-10-07T03:08:51+5:302014-10-07T03:08:51+5:30
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटीत काही करिष्मा दाखविता आलेला नाही. हा तरुण संघ आहे; परंतु त्यांनी लॉर्डस्वर विजय मिळवून इतिहास घडविला

टीम इंडियाला वेळ द्या
मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटीत काही करिष्मा दाखविता आलेला नाही. हा तरुण संघ आहे; परंतु त्यांनी लॉर्डस्वर विजय मिळवून इतिहास घडविला. अनुभवाची कमतरता असल्याने त्यांना इतर कसोटीत सपाटून मार खावा लागला. असे असले तरी या संघाला आणखी एक वर्ष द्यायला हवे आणि त्यांच्याकडून सकारात्मक निकाल मिळेल, असा विश्वास भारताचे माजी कर्णाधार रवी शास्त्री यांनी व्यक्त केला.
मुंबईत पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गोलंदाज २० विकेट घेण्यात अपयशी ठरत असल्यास, फलंदाज काय करतील. त्यांनी कितीही धावा चोपल्या, तरी गोलंदाजांचे अपयश संघावर दबाव निर्माण करतो. त्यांना काही वर्षांची मुदत देण्याची आवश्यकता आहे.
भारताला २० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची आवश्यकता आहे. कसोटीत भारतीय संघ नेममीच बॅड पॅचमध्ये नसेल. लोकांना लगेच विसर पडतो. १८ महिन्यांपूर्वी भारत कसोटीत अव्वल क्रमांकावर होता. टी-२० वर्ल्डकप आणि ५० षटकांचा वर्ल्डकप आपण जिंकलो. याचा विसर लोकांना पडला आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी मांडले. ते पुढे म्हणाले, क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये खेळाडूंना खेळायचे आहे. त्यांना प्रवाहासोबत जाणे आवडते आणि तो त्यांचा हक्क आहे. माझ्या मते, कसोटी क्रिकेट स्वत:च्या चुकांमुळे संघर्ष करत आहे. एकदिवसीय आणि टी-२० सामने बंद केल्यास कसोटीचाही प्राण जाईल. कारण त्यामुळे आर्थिक क्षमता ढासळेल. कसोटीला टी-२०च्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. ५० षटकांच्या आणि टी-२० वर्ल्डकपवर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे. (क्रीडा प्रतिनिधी)