जर्मनीचा संघर्षमय विजय
By Admin | Updated: July 2, 2014 03:02 IST2014-07-02T03:02:00+5:302014-07-02T03:02:00+5:30
आंद्रे शुर्ले व मेसुट ओजिल यांनी अवांतर वेळेत नोंदविलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने सोमवारी खेळल्या गेलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अल्जिरियाचा २-१ ने पराभव केला

जर्मनीचा संघर्षमय विजय
पोर्टो अलेग्रे : आंद्रे शुर्ले व मेसुट ओजिल यांनी अवांतर वेळेत नोंदविलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने सोमवारी खेळल्या गेलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अल्जिरियाचा २-१ ने पराभव केला आणि फिफा विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीला फ्रान्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
निर्धारित वेळेत उभय संघांना गोलची कोंडी फोडता आली नाही. चेल्सीचा फॉरवर्ड शुर्लेने ९२ व्या मिनिटाला पहिला गोल नोंदविला, तर आर्सनलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओजिलने १२० व्या मिनिटाला विजयी गोल केला. अल्जिरियातर्फे अब्दुलमोउमेन दोबूने इंज्युरी टाईमच्या पहिल्या मिनिटाला नोंदविलेला गोल पराभवातील अंतर कमी करणारा ठरला. विश्वकप स्पर्धेत अल्जिरिया प्रथमच बाद फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. अल्जिरियाने तीन वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या जर्मनी संघाला संघर्ष करण्यास भाग पाडत सन्मानाने स्पर्धेचा निरोप घेतला. या लढतीत पहिल्या सत्रात स्पोर्टिंग लिस्बनचा स्ट्रायकर इस्लाम सिलमानीने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला, पण आॅफसाईड नियमामुळे हा गोल मान्य करण्यात आला नाही. जर्मनीचे गोल करण्याचा प्रयत्न अल्जिरियाचा गोलकिपर राऊस मबोही याने हाणून पाडले. त्याने सुरुवातीला टोनी क्रुसचे आणि त्यानंतर रिबाऊंडवर मारिया गोएट््जचे आक्रमण परतावून लावले.
शुर्लेने ४८ व्या मिनिटाला मारलेला फटका गोलपोस्टच्या जवळून गेला. मबोहीने त्यानंतरही कामगिरी सातत्य राखले. निर्धारित वेळेच्या १० मिनिटांपूर्वी त्याने थॉमस म्युलरचा हेडर थोपवीत उत्तर आफ्रिकी संघाचे मनोधैर्य उंचावले. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीमुळे निकालाची कोंडी फोडण्यासाठी सामना अवांतर वेळेत खेळविण्यात आला. शुर्ले अखेर मबोहीचा बचाव भेदण्यात यशस्वी ठरला. त्याने ९२ व्या मिनिटाला म्युलरच्या क्रॉसवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर ओजिलने गोल नोंदविला, तर काही क्षणांतच दोबूने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. (वृत्तसंस्था)