गंभीर-तिवारी यांच्यात हमरीतुमरी!
By Admin | Updated: October 25, 2015 04:09 IST2015-10-25T04:09:24+5:302015-10-25T04:09:24+5:30
फिरोजशाह कोटला मैदानावर शनिवारी दिल्ली-बंगाल रणजी लढतीदरम्यान उभय संघांच्या कर्णधारांदरम्यान चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

गंभीर-तिवारी यांच्यात हमरीतुमरी!
नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला मैदानावर शनिवारी दिल्ली-बंगाल रणजी लढतीदरम्यान उभय संघांच्या कर्णधारांदरम्यान चांगलीच शाब्दिक चकमक झाली.
दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर तसेच बंगालचा कर्णधार मनोज तिवारी हे हमरीतुमरीवर आले. एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दोघांनीही दिली. पंचाने मध्यस्थी करताच त्यांनाही धक्का देण्यात आला. गंभीर आणि तिवारी परस्परांच्या अंगावर धावून आले तेव्हा पंच के. श्रीनाथ यांनी उभय खेळाडूंना समजविण्याचा व शांत करण्याचा प्रयत्न केला. गंभीरने पंचांनाही धक्का दिला. क्रिकेटमध्ये पंचांना धक्का देणे हा मोठा अपराध मानला जातो व बंदीची शिक्षादेखील होऊ शकते.
ही घटना आठव्या षटकात घडली. पार्थसारथी भट्टाचार्य याला मनन शर्मा याने बाद करताच तिवारी चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. त्याने ‘गार्ड’ घेतल्यानंतर फलंदाजी करण्याआधी गोलंदाजाला रोखले व पॅव्हेलियनकडे पाहात ड्रेसिंग रूममधून हेल्मेट आणण्याचा इशारा दिला. तिवारी हेतुपुरस्सरपणे ‘टाईमपास’ करीत असावा, असा दिल्लीच्या खेळाडूंचा समज झाला. मनन व तिवारी यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ सुरू असताना पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला गंभीर तिवारीजवळ आला आणि त्याला शिविगाळ करू लागला. तिवारीनेदेखील गंभीरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. गंभीर म्हणाला, ‘सायंकाळी भेट तुला मारतोच!’ उत्तरात तिवारी म्हणाला, ‘सायंकाळी का, आताच बाहेर
चल!’ गंभीर आणि तिवारी या दोघांना मॅच रेफ्री वाल्मिक बूच यांनी पाचारण केले आहे. (वृत्तसंस्था)