French Open Badminton - Sindhu's challenge ends | फ्रेंच ओपन बॅडमिंटन - सिंधूचे आव्हान संपुष्टात
फ्रेंच ओपन बॅडमिंटन - सिंधूचे आव्हान संपुष्टात

पॅरिस : जागतिक चॅम्पियन असेलेली भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिला फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात शनिवारी पराभवाचे तोंड पाहावे लागले. कडव्या संघर्षानंतर सिंधू अव्वल मानांकित ताई जू यिंग हिच्याकडून एक तास १५ मिनिटांत १६-२१, २६-२४, १७-२१ अशा गुणफरकाने पराभूत झाली.

पाचव्या मानांकित सिंधूला चायनीज तायपेईच्या जूकडून दहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. सिंधू आणि जू यांच्यात जय-पराजयाचा रेकॉर्ड १०-५ असा आहे. सिंधूने जागतिक चॅम्पियनशिप जिंकण्याच्या मार्गात आशियाई सुवर्ण विजेती जू हिच्यावर मात केली होती. याशिवाय २४ वर्षांच्या सिंधूने २०१६ च्या आॅलिम्पिकदरम्यान जू यिंगवर मात केली होती. मागच्या वर्षी विश्व टूर फायनल्समध्येदेखील सिंधूने जूवर मात केली होती.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूचा बासेल येथे विश्व चॅम्पियनशिपचा किताब जिंकल्यापासून स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा सलग चौथा पराभव ठरला. शुक्रवारी सायना नेहवालदेखील पराभूत होऊन बाहेर पडली. 

सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्य फेरीत
भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय जोडीने आपली शानदार कामगिरी कायम करीत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ११ व्या क्रमांकाच्या या जोडीने डेन्मार्कच्या किम एस्ट्रप व एंडर्स रासमुसेन यांना फक्त ३९ मिनिटांत २१-१३, २२-२० असे पराभूत केले.

आता जपानच्या हिरोयुकी अ‍ॅन्डी-युता वाटाम्बे या पाचव्या मानांकित जोडीविरुद्ध त्यांना खेळावे लागणार आहे. यापूर्वी भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या दुसऱ्या मानांकित मोहम्मद अहसान व हेंड्रा सेतियावान या जोडीला पराभूत करीत खळबळ माजवून दिली होती.

Web Title: French Open Badminton - Sindhu's challenge ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.