वेस्ट विंडीजला फॉलोऑन; दुसऱ्या डावात १ बाद २१ धावा
By Admin | Updated: July 24, 2016 04:44 IST2016-07-24T03:17:27+5:302016-07-24T04:44:53+5:30
मोहम्मद शमी व उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान विंडीज संघाने नांगी टाकली. पहिल्या डावात २४३ वर गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांची घसरगुंडी उडाली.

वेस्ट विंडीजला फॉलोऑन; दुसऱ्या डावात १ बाद २१ धावा
ऑनलाइन लोकमत
अँटिग्वा, दि. २४ - फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान वेस्ट विंडीज संघाने नांगी टाकली. पहिल्या डावात २४३ वर गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांची घसरगुंडी उडाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट विंडीजने १ गडी गमावून २१ धावा केल्या. यामुळे भारताकडे अजून ३०२ धावांची आघाडी आहे. गोलंदाज इशांतने एक बळी टिपला.
भारताच्या ५६६ धावांचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात अडखळती झाली. तिस-या दिवशी १ बाद ३१ धावा अशी सुरुवात केली. मात्र दोन तासांच्या पहिल्या सत्रात यजमानांनी आणखी दोन गडी गमावले. यामध्ये लेगस्पिनर अमित मिश्रा आणि शमी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा क्रेग ब्रेथवेट (नाबाद ४६) आणि अनुभवी मर्लोन सॅम्युअल्स खेळपट्टीवर होते. तिस-या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा ब्रेथवेट ११ आणि नाइट वॉचमन म्हणून आलेला देवेंद्र बिशू शून्यावर नाबाद होता. दोघांनी भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-याला झुंज देताना संघाची धावसंख्या ६८ वर नेली. मिश्राच्या अप्रतिम चेंडूवर यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने बिशूला यष्टिचित केले. बिशूने ४२ चेंडूंत १२ धावा केल्या. यानंतर, शमीने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना उपाहारापूर्वी डॅरेन ब्राव्होचा महत्त्वपूर्ण बळी मिळवत त्याला साहाकरवी झेलबाद केले. उपाहारापर्यंत विंडीजने ३ बाद ९० अशी मजल मारली होती. या वेळी विंडीजची आशा अनुभवी सॅम्युअल्सवर होती. मात्र, शमीच्या गोलंदाजीवर तोही ४९ व्या षटकातील दुसºया चेंडूवर साहाकडे झेल देऊन परतला, तर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर नुकताच खेळपट्टीवर आलेल्या जेरमैन ब्लॅकवूडला शून्यावर बाद करून शमीने विंडीज फलंदाजीला खिंडार पाडले. शमीने मार्लाेनला बाद करून कसोटी क्रिकेटमधील आपला ५०वा बळी घेतला. ब्रायन लाराचा वारसदार मानला जाणा-या डॅरेन ब्राव्होला (११) तीन हजार धावा करण्यासाठी १ धाव कमी पडली. त्यालादेखील शमीनेच बाद केले.