Kolhapur- केएसए वरिष्ठ गट फुटबॉल लीग: सामन्यात फिक्सिंगची किक?, उघड चर्चेमुळे खळबळ

By सचिन यादव | Updated: February 3, 2025 18:43 IST2025-02-03T18:10:21+5:302025-02-03T18:43:38+5:30

तीन फुटबॉल संघांनी एका संघाला प्रत्येकी एक लाख रुपये दिल्याची चर्चा

Fixing some football matches in KSA senior group football league tournament in Kolhapur | Kolhapur- केएसए वरिष्ठ गट फुटबॉल लीग: सामन्यात फिक्सिंगची किक?, उघड चर्चेमुळे खळबळ

संग्रहित छाया

सचिन यादव

कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर शाहू केएसए वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत काही फुटबॉल सामन्यात फिक्सिंग झाल्याचे समजते. अंतिम सामना कोणत्या संघात होणार आहे, याची नावेही फुटबॉलप्रेमी उघडपणे सांगत आहेत. तीन फुटबॉल संघांनी एका संघाला प्रत्येकी एक लाख रुपये दिल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकाराचे गौडबंगाल कायम आहे.

कोल्हापुरात पेठापेठांत फुटबॉलचे वेड आहे. त्यातून प्रत्येक पेठेतून एक फुटबॉल संघ तयार झाला. स्पर्धेच्या आधी सहा महिने खेळाडू सराव करतात. त्यासह काही जण खासगी नोकरी करूनही फुटबॉलचे प्रेम जपतात. वर्षातील आठ महिने फुटबॉलचे सामने रंगतात. त्यात बहुतांशी नावाजलेल्या संघाचा सामन्यात सहभाग असतो. ज्युनिअर आणि सीनिअर गटात या स्पर्धा होतात. सध्या सुरू असलेले सामने फिक्सिंग झाल्याची चर्चा फुटबॉल प्रेमींमध्ये सुरू आहे.

शहरातील नावाजलेल्या तीन फुटबॉल संघांनी एका संघाला सामना खेळू नये, म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये दिल्याचे समजते. सामन्यात संघ खेळला नाही, तर त्यांचे तीन गुण कमी होतात. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतो. काही सामने गोलशून्य बरोबरीत का होतात. ट्रायब्रेकरवर सामन्यातही फिक्सिंग झाल्याची चर्चा आहे. कोण हरणार आणि कोण जिंकणार याची नावेही फुटबॉलप्रेमी आता उघडपणे बोलू लागले आहेत.

२०१८ मध्ये असाच प्रकार

कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वात मॅच फिक्सिंग होणे हानीकारक आहे. या पद्धतीने सामने होत असतील, तर त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या चंद्रकांत महासंग्राम वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेतील एका सामन्यात फिक्सिंग झाल्याची चर्चा होती. त्या वेळी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने ही बाब फुटबॉलसाठी घातक आहे. त्याला आळा घालण्यासाठी भविष्यात कठोर पाऊले उचलणार असल्याचे आश्वासन दिले होते.

केएसए काय कारवाई करणार

ऐन वेळी मैदानावर संघ का येत नाही. त्यांच्या पाठीमागील कारणे वेगळी आहेत. या कारणांचा शोध केएसएने घ्यावा, अशी फुटबॉलप्रेमींची मागणी आहे. संघ आला नसल्यास तीन गुण कमी होतात. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतो.

Web Title: Fixing some football matches in KSA senior group football league tournament in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.