पहिली कसोटी अॅडिलेड ओव्हलवर
By Admin | Updated: December 2, 2014 01:42 IST2014-12-02T01:42:12+5:302014-12-02T01:42:12+5:30
: भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना अॅडिलेडमध्ये ९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

पहिली कसोटी अॅडिलेड ओव्हलवर
सिडनी : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना अॅडिलेडमध्ये ९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युज याच्या निधनानंतर खेळाडू मानसिक धक्क्यात असल्याने नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिली कसोटी ४ ऐवजी ९ डिसेंबरला अॅडिलेड
येथे खेळविण्यात येणार असल्याचा दावा येथील स्थानिक वृत्तवाहिनीने केला आहे.
या वाहिनीच्या दाव्यानुसार, ब्रिसबन कसोटी १७ डिसेंबरला, मेलबर्न कसोटी २६ डिसेंबरला आणि अखेरची कसोटी सिडनीत ६ जानेवारीला होणार आहे. या वृत्ताचा सीएकडून इन्कार होत असला, तरी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर मालिकेचे वेळापत्रक टाकण्यात आले आहे. त्यानुसार या मालिकेला ९ डिसेंबरला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील केवळ मेलबर्न कसोटीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गुरुवारपासून ब्रिसबन कसोटीला प्रारंभ होणार होता; परंतु बुधवारी ह्युजच्या अंत्यसंस्कारामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आल्याचे सीएने जाहीर केले.
या मालिकेच्या वेळापत्रकातील बदलावर अनेक चर्चा झाल्या. यात गाबा आणि अॅडिलेड कसोटीच्या तारखेत बदल, ब्रिसबन सामना शेवटी खेळवावा आदी पर्यायांवर चर्चा करण्यात आली. या बदलांमुळे आगामी तिरंगी मालिकेवरही परिणाम होऊ शकतो. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळाडूंना विश्रांतीसाठी अधिक काळ देण्यात आला आहे. तसेच ४ व ५ डिसेंबरला भारत अॅडिलेडमध्ये सराव सामना खेळण्यास सज्ज आहे. याआधी सीएने ट्विटरवर जाहीर केले, की भारताविरुद्ध पहिल्या कसोटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही; परंतु ही कसोटी अॅडिलेडमध्येच खेळविण्यात येईल. सीए आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू आहे.
आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी मात्र अॅडिलेड हे या कसोटी मालिकेच्या प्रारंभासाठी योग्य स्टेडियम असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही मालिका पाच दिवस पुढे ढकलल्यामुळे दोन्ही संघांना अंतिम संघ निवडण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि मायकल क्लार्क दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळणार नव्हते. मात्र, या निर्णयामुळे या दोघांनाही दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक काळ मिळाला आहे. (वृत्तसंस्था)